संग्रहित छायाचित्र
पालघर जिल्ह्यातील वसई विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. १९९० पासून या वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा आहे. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, काँग्रेसचे विजय गोविंद पाटील आणि भाजपाच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांच्यात 'काँटे की टक्कर' झाल्याचे बघायला मिळाले. या निवडणुकीत वसईमध्ये अभूतपूर्व असा निकाल लागला आणि स्नेहा दुबे-पंडित यांनी गेली दोन दशके मतदारसंघावर दबदबा असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांचा ३ हजार १५३ मतांनी पराभव केला. वसई हा ठाकूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात त्यांचा पराभव होईल असा विचार देखील कोणी करू शकत नव्हते. मात्र यंदाच्या निवडणूकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाल्याचे बघायला मिळाले. त्यात ठाकूर यांचा देखील नंबर लागला.
या निवणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या स्नेहा दुबे-पंडित यांना ७७ हजार ५५३ इतकी मते मिळाली. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे ७४ हजार ४०० मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले तर काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांना ६२ हजार ३२४ इतके मतदान झाले. या निवडणुकीत स्नेहा दुबे-पंडित या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारापेक्षा ३ हजार १५३ मतांनी आघाडीवर राहिल्या.
आधी मुंबई उपनगरचा भाग असलेला वसई विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पालघर लोकसभा मतदारसंघाचा भाग बनला. वसई हे मुंबई शहराच्या जवळील एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला आले आहे. या मतदारसंघात ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही प्रकारची वस्ती आढळून येते.
१९९० पासून वसई विधानसभा मतदारसंघावर हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा राहिल्याचे दिसते. १९९० मध्ये ठाकूर यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून जिंकली. त्यांनी वसई विकास मंडळ या नावाने राजकीय पक्षाची स्थापना केली. नंतर त्याचे नाव बदलून बहुजन विकास आघाडी असे करण्यात आले. तसेच १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून ते पुन्हा आमदार झाले. २००९ मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी वसई मधून निवडणूक लढवली नाही. त्यांच्या ऐवजी ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नारायण मानकर यांना तिकीट दिले. या निवडणुकीत मानकर यांचा पराभव झाला. अपक्ष निवडणूक लढलेले श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित हे निवडून आले. २०१४ साली हितेंद्र ठाकूर पुन्हा मैदानात उतरले. त्यांनी पंडित यांचा पराभव करत पुन्हा विधानसभा गाठली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही ठाकूर विजयी झाले. वसई-विरार हा सुमारे दोन दशके ठाकूर यांचा गड बनून राहिला. २०१९ पर्यंत त्यांना एकदाही परभवाला सामोरे जावे लागले नाही. तसेच ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई-विरार, नालासोपारा, डहाणू आणि पालघर जिल्ह्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा राजकीय सत्ता मिळवली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांनी ठाकूर यांना टक्कर दिली. पालघरमध्ये जन्मेलेल्या स्नेहा दुबे-पंडित या श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत. त्यांचे कायद्याचे शिक्षण झाले असून वडीलांप्रमाणेच त्यांना देखील समाजकार्यात सुरुवातीपासून स्वारस्य आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा-विक्रमगड या भागात महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सुमारे ३०० महिला बचत गट चालवून त्यांनी हजारो महिलांना काम मिळवून दिले. तसेच पालघर जिल्ह्यातील ७० महिला सरपंचांना त्यांनी प्रशिक्षण देवून महिला राजकीय नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघात स्नेहा दुबे-पंडित यांचा साधेपणाची देखील चर्चा असते. विधानसभेत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकत त्यांनी ठाकूर यांचा पराभव केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी विवेक पंडित यांना मात दिली. या पराभवाची परतफेड पंडित यांची कन्या स्नेहा यांनी यंदाच्या निवडणुकीत केल्याचे बोलले जात आहे.
हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा यांच्या सासऱ्याचे कनेक्शन
हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ भाई उर्फ जयेंद्र ठाकूर यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. ८० च्या दशकात वसईमध्ये भाई ठाकूर यांचा दबदबा होता. नालासोपारा, वसई-विरार या भागात जमिनीच्या व्यवसायातून आणि उलाढालींमधून त्यांनी भरपूर पैसे कमावले. तसेच प्रसंगी त्यांनी दमदाटी केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. उत्तर प्रदेशातील गोरखपुर इथून आलेल्या सुरेश दुबे यांच्याशी त्यांचे वाद झाले. दुबे हे एक बांधकाम व्यावसायिक होते. एका जमिनीच्या तुकड्यावरून हे वाद झाले होते. पुढे सुरेश दुबे यांची नालासोपारा रेल्वे स्थानकावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाई ठाकूर आणि इतरांवर दुबे यांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला. तसेच टाडा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने ही केस कोर्टात लढवली. पंडित यांनी दुबे यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र २०२३ मध्ये भाई ठाकूर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हितेंद्र ठाकूर हे भाई ठाकूर हे यांचे सख्खे भाऊ. तर स्नेहा दुबे-पंडित या सुरेश दुबे यांचा सून. त्यामुळे राजकीय रंगासोबतच वैयक्तिक रंग देखील या निवडणुकीत भरले गेले होते. स्नेहा दुबे-पंडित यांनी निवडणूक जिंकत आपल्या वडिलांच्या २०१४ च्या पराभवाचा वचपा काढलाच. त्यासोबतच आपल्या सासऱ्यांचा देखील बदला घेतला असे बोलले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.