संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. ‘‘राम मंदिरातील भगवान रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व रावण रामाचा मुखवटा घालून फिरत होते, आपल्यालाही वालीचा वध करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या हक्काची शिवसेना पळवणारे वाली आणि त्यांचे कुणीही वाली असतील त्यांचा आम्ही राजकीय वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही,’’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
त्यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 'बाळासाहेब भवन' येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘सत्तेच्या मोहापायी कॉंग्रेसला मांडीवर घेतलेल्या ठाकरेंना रामाने सद्बुद्धी द्यावी. अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार विकले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. सत्तेच्या खुर्चीपायी, मोहापायी काँग्रेसला मांडीवर घेतलं, काँग्रेसला डोक्यावर घेतलं. महाराष्ट्रातील करोडो जनतेबरोबर विश्वासघात केला. बेईमानी केली.’’
निवडणुका एकाबरोबर, हनिमून दुसऱ्याबरोबर आणि संसार तिसऱ्याबरोबर हे धंदे करणाऱ्यांना असे बोलणं शोभत नाही. राम आणि रावण कोण आहे हे संपूर्ण जनतेला माहित आहे. रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं हेही माहित आहे. अहंकारी रावणामुळे लंकेचं काय झालं हे पाहिलं. त्यामुळे अंहकारी राज्यकर्ते असता कामा नये. राज्याचं हित कशात आहे हे लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे, असे शिंदे यांनी ठाकरेंना सुनावले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.