काँग्रेसमधील गटबाजीची धंगेकरांना डोकेदुखी!

कसबा मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला धूळ चारली तेव्हापासून धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत. लोकसभेला कसब्याच्या निकालाची पुनरावृत्ती करून भाजपला

Ravindra Dhangekar

संग्रहित छायाचित्र

पक्षविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतून धाडले पथक

कसबा मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र  धंगेकर यांनी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला धूळ चारली तेव्हापासून धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत. लोकसभेला कसब्याच्या निकालाची पुनरावृत्ती करून भाजपला आस्मान दाखविण्याचा निश्चय कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळेच पुणे लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रसने आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आहे. मात्र, धंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून अद्यापही ही नाराजी दूर झालेली नाही. या नाराजीची दखल दिल्लीतील नेत्यांनी घेतली असून धंगेकर यांच्यासमोर आपल्याच नेत्यांचे आव्हान कायम राहिल्याने पक्षाचे केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले आहे. हे पथक पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर लक्ष ठेवणार आहे.

कॉंग्रेसने (Pune Congress) लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले होते. त्यावेळी तब्बल २३ जणांनी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न कॉंग्रेसपुढे उभा राहिला होता. कसब्यातील कामगिरीमुळे पुण्यात दमदार नेता म्हणून धंगेकरांची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यातच जनमानसातूनही धंगेकरांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यातच भाजपचे उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करायचे असेल तर धंगेकर हा एकमेव पर्याय असल्याचे अनेकांचे मत पडले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे धंगेकरांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर कॉंग्रेसमधील नेत्यांची नाराजी दिसून आली.

कॉंग्रेसच्या राज्याचे निवडणूक प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात पुण्यातील नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी कोणतीही अंतर्गत नाराजी नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र धंगेकरांच्या प्रचारात तसे दिसून येत नाही. याची गंभीर दखल काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. त्यासाठी विशेष निरीक्षक पथक पुण्यात पाठवले आहे. या पथकाकडून काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, याची माहिती संकलित केली जाणार असून ती केंद्रीय पातळीवर पाठवली जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवरच्या सूचनांनुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे.

भाजपमध्येही नाराजी...?

भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनीदेखील लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी पुणेकरांचे लक्ष वेधले होते. पुणे लोकसभेसाठी आपणच उमेदवार असल्याचे चित्र त्यांनी उभे केले होते. दुसरीकडे मोहोळ यांनीदेखील मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून उमेदवारी पक्की असल्याचे ठासून सांगितले होते. भाजपच्या नेत्यांची मर्जी राखण्यात मोहोळ यांना यश आले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर मोहोळ यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तसेच आढावा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र गेल्या आठवड्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांना मुळीक हे उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपमधील नाराजी उघड झाली होती. मात्र, सध्या तरी भाजपाला अंतर्गत नाराजी दूर करण्यात यश आले असल्याचे दिसून येत आहे.

पथकाची जबाबदारी

 पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर लक्ष

 स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दूर करणार

 उत्तर भारतीय मतदारांना पुण्यात रोखून ठेवणे

 १३ मे रोजी उत्तर भारतीय मतदारांना केंद्रापर्यंत आणणे 

काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही. रोज पक्षाच्या बैठका होत आहेत. त्यामध्ये सर्व नेते उपस्थित राहात आहेत. एकदिलाने काम केले जात आहे. केंद्रीय पथक दाखल झाले असते तर आमच्या पर्यंत ही माहिती पोहोचली असती. अशा कोणत्या पथकाच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

- अरविंद शिंदे, पुणे शहराध्यक्ष, कॉंग्रेस

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest