संग्रहित छायाचित्र
केंद्रात एनडीए सरकार स्थापन होऊन २४ तास उलटले नाही तोच घटक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगायला लागले आहे. मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरीचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
एनडीएने केंद्रात सरकार स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्य मंत्रिपद दिले जाणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र कारभार आलेले राज्य मंत्रिपद ऑफर करण्यात आल्याने ही ऑफर नाकारत राष्ट्रवादीने मंत्रिपद स्वीकारले नाही.
शिवसेनेला राज्य मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेतील नेत्यांमध्ये मात्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात मानाचे पान मिळवणाऱ्या शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना केंद्रात सत्तेत न्याय्य वाटा मिळाला नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बारणे म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करता शिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावे ही माफक अपेक्षा होती. चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे १२ खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे ७ खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. कुमारस्वामी यांचे दोन खासदार कर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहारमधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले, तर शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमची अपेक्षा होती. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ आमच्या खासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळाले असते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता आमची ही माफक अपेक्षा लक्षात घ्यायला हवी होती. आमची मागणी आणि भूमिका आमचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांनी व्यक्त केली आहे, असे खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले. खासदार बारणे यांच्या रूपाने पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेला एकच राज्य मंत्रिपद दिले गेल्याने चार वेळा खासदार असणाऱ्या प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यामुळे बारणे यांचे मंत्रिपद हुकले. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील नाराजी व्यक्त केली असून, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी याबाबत आपली खदखद बोलून दाखवली आहे.
माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते नाराज - आमदार अण्णा बनसोडे
आगामी विधानसभा लक्षात घेता, मंत्रिपदासाठी झुकते माप गरजेचे होते. दादांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला; तो मोठा विरोध पत्करून घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांना या सर्वाची कल्पना होती. चार जागांवर उमेदवारी मिळाल्यावर त्यापैकी एका जागेवर आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे निवडून आले. तर आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल हे राज्यसभेचे सभासद आहेत. वास्तविक बघितले तर या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच दादांच्या गटाची अशी इच्छा होती की कमीत कमी पटेल यांना तरी कॅबिनेट मंत्रिपद देतील. मात्र, कालच्या एकंदर घडामोडी पाहिल्या तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नाराजी व्यक्त करत असताना तुम्हाला आम्हाला दिसत आहेत. तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत. वास्तव बघितले तर शिंदे साहेबांचे सात खासदार या वेळेस निवडून आलेत. त्यांना कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपद द्यायला पाहिजे होते. अजित दादा आणि शिंदे साहेब हे दोन्ही दिग्गज नेते, प्रभावी नेते भाजपसोबत गेली अनेक दिवसांपासून काम करीत आहेत. पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरंतर दोन्ही पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे होते. एकंदर बघायला महाराष्ट्रात सहा मंत्रिपदे देण्यात आली. इतर राज्यांमध्ये काही काही ठिकाणी एखाद्या पक्षाचा एकच खासदार असेल तरी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. महाराष्ट्राला जास्तीत जास्त झुकते माप द्यायला पाहिजे होते, पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी कमीत कमी असा निर्णय मी घ्यायला पाहिजे होता.