चित्रपटाच्या ट्रेलरनिमित्त उखाळ्या-पाखाळ्यांना ऊत

'धर्मवीर' सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर लाँच सोहळा शनिवारी (२० जुलै) पार पडला. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून उद्धव ठाकरे यांना अनेक टोले लगावण्यात आले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून आता दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 10:44 am
Entertainment news, new movie, Dharmaveer, pravin tarde, Dharmaveer 2, bollywood, new releasing, mukkam post thane, anand dighe, Suresh Wadkar, counter-accusations.

संग्रहित छायाचित्र

'धर्मवीर २' चित्रपटाच्या ट्रेलरनिमित्त 'उबाठा' आणि शिवसेनेच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई: 'धर्मवीर' सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर लाँच सोहळा शनिवारी (२० जुलै) पार पडला. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून उद्धव ठाकरे यांना अनेक टोले लगावण्यात आले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून आता दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. 'उबाठा'चे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी परस्परांवर शाब्दिक चिखलफेक केली आहे. राऊतांच्या मते बेईमान लोक दिघेंच्या नावाखालील भंपक गोष्टी दाखवत आहेत, तर म्हस्के यांनी, संजय राऊतांमुळे दिघेंना तुरुंगवास भोगावा लागल्याचा दावा केला आहे.  

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर आधारित असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटातील डायलॉगमुळे सध्या हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही चित्रपटात काही काल्पनिक गोष्टी दाखवलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आनंद दिघे यांना मानसिक त्रास दिला आहे, हे जर लोकांसमोर आणले तर लोक तुम्हाला घरात राहू देणार नाहीत. संजय राऊत यांनी दिघे साहेबांची एक मुलाखत वेगळ्या पद्धतीने छापली होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना टाडा लागला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, संजय राऊत हे नेहमी दिघे साहेबांचा तिरस्कार करायचे. मातोश्रीमध्ये तेल टाकण्याचे काम ते करायचे.

काही गोष्टी आमच्या मुठीत आहेत, त्या उघडायला लावू नका”, असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिला. मातोश्रीमध्ये दिघे साहेबांचे कौतुक कधीही झालं नाही. फक्त निवडणुकीला त्यांचे नाव घेतात. आनंद दिघे गेल्यानंतर त्यांचा स्मृतिदिन गडकरी सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र त्यावेळेला मातोश्रीमधून फोन करून तो कार्यक्रम रद्द केला गेला, असा आरोपही म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केला. दिघे साहेबांचे काम जगाला दाखवण्याचे काम एकनाथ शिंदे करतात. ती गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी युतीमध्ये निवडणूक लढली आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी ते काँग्रेस बरोबर जाऊन बसले, असेही नरेश म्हस्के यांनी म्हटले. 

बोगस आणि भंपक चित्रपट- संजय राऊत
हिंदुत्वाच्या ज्या काही वेगळ्या चुली मांडण्यात आल्या आहेत; त्या आनंद दिघेंनीही कधी मान्य केल्या नसत्या. हे चित्रपट बोगस आणि भंपक आहेत. आपल्या खोटेपणावर पांघरुण घालण्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट याआधीही अनेक आले आहेत. काश्मीर फाईल्स भाजपाच्या लोकांनी निर्माण केले आहेत. आपल्या खोट्या भूमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला गेला आहे. हे सर्व चुकीचे आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. जे असत्य आहे त्याची चिंता आपण का करायची? पहिल्या चित्रपटात आनंद दिघेंचा महानिर्वाण दाखवला असताना त्यानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभा निवडणुका असल्यामुळे खोट्याला उजाळा द्यायचा देण्यासाठी हे सर्व सुरू आहे.

आनंद दिघेंसारखे महान निष्ठावान शिवसैनिकाचा, शिवसेना नेत्याचा वापर करणे सुरू आहे. आपल्या खोटेपणावर पांघरुण घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत. याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ असेल, ‘द ताश्कंद फाइल्स’ असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे; त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलंय की, सत्य बोला आणि इमानाने जगा. जर बेईमान लोक आनंद दिघेंना गुरू मानून त्यांचे खोटे चित्र समोर आणत असतील तर तो आनंद दिघेंचा अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल; पण भविष्यात तुम्हीसुद्धा या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलेला आहे. दिघेंच्या नावाखाली खोट्या गोष्टी पसरवणे चुकीचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest