मोदी यांनीच शरद पवारांना पद्मविभूषण दिल्याचे शाह विसरले; जयंत पाटील, संजय राऊत यांची भाजप नेत्यांवर टीका

पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी अधिवेशनात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जहरी टीका करत पक्षाच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 11:23 am
Union Home Minister Amit Shah, Bharatiya Janata Party, Pune, Uddhav Thackeray Sena, NCP chief Sharad Pawar, Assembly elections, Congress, politics

संग्रहित छायाचित्र

मुंबई : पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी अधिवेशनात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जहरी टीका करत पक्षाच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. शाह यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांनाच टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याचे अमित शाह विसरल्याचे दिसतात, अशा शब्दात पाटील यांनी शाह यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शाह फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.  

शाह यांच्या टीकेवर त्यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी आपणाला काही उत्तर द्यावयाचे नाही असे सांगत उत्तर टाळले. शाह यांच्या टीकेवर अजित पवार गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे समर्थक अण्णा बनसोडे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपानेही कबूल केलेलं आहे. भाजपाने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असे म्हटले होते. अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेले आहे, ते योग्य नाही.

धनजंय मुंडे म्हणाले की, अमित शाह बोलल्यानंतर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही. काही तरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत होते. त्यांनी अनेक वर्षे शरद पवार यांच्याबरोबर काम केले आहे. त्यामुळे मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शाह ही बाब विसरलेले दिसतात की त्यांच्याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्या-ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सर्व लोकांना भाजपाने आपल्याबरोबर घेतले आहे. पाटील यांनी येथे नामोल्लेख टाळून अजित पवारांना टोला लगावला आहे.

शाह यांनी महाविकास आघाडी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. टीकेला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आता अमित शाह यांना जबरदस्त टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही.

आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लिमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचं नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिलं आहे. लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. निवडणुकीवेळी महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र, तरीही महाराष्ट्राने त्यांचा दारुण पराभव केला, हे ते विसरलेले दिसतात. उद्धव ठाकरे, शरद पवार राज्यातील सन्मानीय व्यक्ती आहेत. आम्ही ईव्हीएम, निवडणूक रोखे आणि ईडी-सीबीआयचे घोटाळे करून निवडणूक जिंकत नाही. 

फडणवीसांची ठोकशाहीची भाषा 
देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारची भाषा वापरली, हे सर्वांनी बघितलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा, असं फडणवीस म्हणाले. ही कुठली भाषा आहे? राज्याचे गृहमंत्री एका गुंडासारखी भाषा वापरतात, हे दुर्दैवी आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. चोरीच्या घटना घडत आहे, असे असताना गृहमंत्री ठोकशाहीची भाषा करतो? फडणवीसांनी आधी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग ठोकशाहीची भाषा करावी. ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest