संग्रहित छायाचित्र
मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे पक्षाची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेला तब्बल ९ खासदार निवडून आणत घवघवीत यश मिळवले होते, मात्र, विधानसभेला विरोधकांचा उधळलेला वारू रोखण्यात महायुतीला यश मिळाले. आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोठी खेळी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे एकेकाळचे दोन जुने पश्च पुन्हा एकदा एकत्र येणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्यासाठी ठाकरे गट आणि भाजपच्या पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याचे समजते. महायुतीने विधानसभा निवडणुकीत तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार मात दिली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने तब्बल ५७ जागा जिंकल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला होता. त्यानंतर ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, ही दोन्ही महत्त्वाची पदे न देता, त्यांची दोन अन्य महत्त्वाच्या खात्यांवर बोळवण करण्यात आल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले होते. त्यामुळेच भाजपला शिंदेंची मनधरणी करण्यासाठी बराच घाम गाळावा लागला.
दुसरीकडे, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या टेकूवर उभे आहे. चंद्राबाबू यांचा टीडीपी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू तसेच एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष यामुळे मोदींना सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्यात आले. मात्र, बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्याआधी नितीश कुमार हे एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता असल्यामुळे भाजपकडून दुसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना हे हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आक्रमक राजकारण करत असल्यामुळे भाजपकडून ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून फक्त शिंदेंना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपविरोधी सूर मावळला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नितीश कुमारांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास, मोदींचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते. मात्र, केंद्रातील सरकार कायम ठेवण्यासाठी भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा होऊ शकतो. ठाकरेंकडे सध्या ९ खासदार आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत घेण्यासाठी सध्या पडद्यामागून हालचाली सुरू आहेत.