maharashtra politics news
राज्यात पुन्हा राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रफुल्ल पटेलांना मंत्री करण्यसाठी अजित पवारांच्या जोरदार हालचाली सुरु असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. पण तटकरे यांनी हा आरोप फेटाळून लावलेला आहे.
केंद्राच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी पडद्यामागून अजित पवारांच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यासाठी शरद पवार गटाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी अजित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्या खाद्यावर दिली असल्याचे बोलले जात आहे.
सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवार गटाच्या 7 खासदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण खासदारांनी ऑफर नाकरली. या गोष्टीची गंभीर दखल घेत सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेल यांना फोन करत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी यासर्वावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
जोपर्यंत शरद पवार यांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल पटेल यांना हवं आहे. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो खासदारांचा कोटा लागतो तो पूर्ण करा असं प्रफुल पटेल यांना सांगितलं आहे. त्यासाठी शरद पवार गटाचे सहा ते सात खासदार फोडावे लागतील तेव्हाच प्रफुल पटेलांना मंत्रिपद मिळेल. त्याचा राज्याला आणि देशाला काही एक फायदा नाही. पण पटेल यांना मंत्री व्हायचं आहे किंवा तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि त्यासाठीत शरद पवार गटाचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु आहे. असा दावा करत ईव्हिएमवर राऊतांनी पुन्हा तोफ डागली.
ईव्हिएमच्या माध्यमातून तुम्ही विधानसभा जिंकलात ना तरी तुमची फोडाफोडीची हौस भागत नाही, असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला.