मुंबई : सत्यपाल मलिक ‘मविआ’ साठी मैदानात; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मुंबई : कधी-काळी भारतीय जनता पक्षाशी जवळकीचे संबंध असलेले जम्मू- काश्मीर, गोवा आणि मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Mon, 23 Sep 2024
  • 02:41 pm
atya Pal Malik, former Governor, Jammu and Kashmir Goa Meghalaya, meeting Uddhav Thackeray, Shiv Sena leader, BJP ties

सत्यपाल मलिक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होण्याचा व्यक्त केला विश्वास

मुंबई : कधी-काळी भारतीय जनता पक्षाशी जवळकीचे संबंध असलेले जम्मू- काश्मीर, गोवा आणि मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होईल, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी या भेटीनंतर दिली. मलिक यांच्या विधानाने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असल्याने त्यावेळी घडलेल्या अनेक घटनांबाबत मलिक यांनी आपली मते नंतरच्या काळात व्यक्त केली होती. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. मलिक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपाला नुसताच फटका बसणार नाही तर या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे कुणाला काळजी करण्याची गरज नाही.

मलिक यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. इंग्रजीमधील ‘लास्ट नेल इन बीजेपी कॉफिन’ या प्रसिद्ध म्हणीचा उच्चार करत मलिक म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे भाजपासाठी अंताची सुरुवात असेल.

त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे देशाच्या राजकारणासंदर्भात असलेले महत्त्व विशद केले. विधानसभेचे जे निकाल येतील, त्याच्यावरून संबंध देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असतानाच अनुच्छेद ३७० बाद करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला होता. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दरम्यान यावेळी जोरदार लढाई होणार आहे.

सत्यपाल मलिक यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, राज्यपाल निवृत्त झाल्यानंतर अशा भेटीगाठी घेतच असतात. त्यांनाही कुठे जागा राहिलेली नसते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पुन्हा राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest