हे सिल्लोड आहे की पाकिस्तान? दानवे यांचा सत्तारांना टोला

जालना: लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसलेले माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि महायुती सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वैर जगजाहीर आहे. आपल्या पराभवामागे सत्तार असल्याचा जाहीर आरोप दानवे यांनी केला होता

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 20 Sep 2024
  • 02:47 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महायुतीत तणावाची शक्यता

जालना: लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसलेले माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि महायुती सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यातील वैर जगजाहीर आहे. आपल्या पराभवामागे सत्तार असल्याचा जाहीर आरोप दानवे यांनी केला होता, तर सत्तार यांनीही काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना मदत केल्याचे नाकारले नव्हते. त्यानंतर दानवे यांनी सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा विडाच उचलला आहे. आता त्यांनी सत्तार यांच्या मतदारसंघात जाऊन सिल्लोड आहे की पाकिस्तान, असा सवाल केला आहे. त्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

रावसाहेब दानवे हे भाजपचे (BJP) नेते आहेत. त्यांच्यावर भाजपच्या प्रचाराची जबाबदारी आहे, तर अब्दुल सत्तार हे शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवाय महायुती सरकारमध्ये ते मंत्रीही आहेत. असे असतानाही या दोन नेत्यांमधून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. हे दोघेही एकमेकाला पाण्यात पाहतात. महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून येत असून त्याचा प्रत्यय सध्या सिल्लोडमध्ये दिसून आला आहे. सिल्लोड हा अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून जाऊन रावसाहेब दानवे यांनी थेट अब्दुल सत्तार यांना आव्हान दिले आहे. त्यांचा एक व्हीडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. या व्हीडीओत ते म्हणतात की, सिल्लोड है या पाकिस्तान है, इथे राहायचे की पलायन करायचे. इथे सत्तारांची दहशत असल्याचे ते अधिरेखीत करत होते. यावेळी त्यांनी काश्मीरचा किस्साही सांगितला आहे. काश्मीरमध्ये गेलो. तिथल्या लोकांबरोबर चर्चा केली. फाळणीनंतर तुम्ही पाकिस्तानात गेलात की इथे राहिलात. तिकडे कोण तुमचे नातेवाईक आहेत का? अशी विचारणा केली तर ते म्हणाले की ते लोक कधीच मुस्लीम झाले. तसेच सिल्लोडमध्ये होईल, असेही दानवे बोलताना दिसत आहेत.

सिल्लोडमध्ये (Silod) एक कॉलेज बांधले जात आहे. ते बांधल्यानंतर ही स्थिती निर्माण होईल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे जागे व्हा. गेल्या निवडणुकीत एका मताचा भाव ५०० रुपये होता. आता हा भाव १ हजार असणार आहे. त्यामुळे खरे खानदानी असाल तर पैशाला भुलू नका. धोरणाला मतदान करा. मग तो उमेदवार कोणी असेल तरी चालेल असे आवाहन करताना ते दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या विधानाचे पडसाद सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात उमटले आहेत. पाकिस्तान असा उल्लेख केल्याने तालुक्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे, तर दानवे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्यावर कडक कारवाई करून तत्काळ अटक करा, या प्रमुख मागणीसाठी  सिल्लोड येथे निषेध मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अब्दुल सत्तार विरुध्द रावसाहेब दानवे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest