संग्रहित छायाचित्र
शिवाजीनगर हा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा शहरातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. काॅस्मोपाॅलिटन आणि झोपडपट्टीचा समावेश असलेल्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध काॅंग्रेस असा थेट सामना यावेळी रंगणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला भाजपकडून थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ती कसर भरून काढण्याच्या इराद्याने काॅंग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मताधिक्याने बाजी मारण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांचेही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष होते. त्याची कारणे अर्थातच विधानसभेच्या मागील म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत आहेत. ५,१२४ अशा फारच थोड्या मतांच्या फरकाने हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला. त्यामुळे यंदा विधानसभेला आपल्याला येथून विजय मिळेल, अशी आशा काँग्रेससह महाविकास आघाडीला आहे. दुसरीकडे हा आपलाच मतदारसंघ असून विकासकामे आणि निधी खर्च केल्यामुळे पुन्हा विजय मिळविण्याचा विश्वास भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आहे.
इच्छुकांची संख्या जास्त असली तर बंडखोरी होणार नाही. घटक पक्षांच्या एकत्रित ताकदीने महायुतीला कधीही धोका होणार नाही, याची खात्री त्यांना आहे सिद्धार्थ शिरोळे हे २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांचे वडील अनिल शिरोळे त्याआधी पुण्याचे खासदार होते. त्याआधीही शिरोळे घराण्याकडेच येथील सत्ता होती. पण हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. २००८ मध्ये त्याची पुनर्रचना झाली. कोथरूडचा बराच मोठा भाग त्यातून निघाला. खडकी कॅन्टोन्मेट शिवाजीनगरला जोडण्यात आले. त्याशिवाय बोपोडी, औंध रोड आणि खडकी स्टेशन परिसरदेखील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.
उच्चभ्रू सोसायट्यांसह पोलीस वसाहतींपासून ते गरीब, कष्टकऱ्यांच्या वसाहतींपर्यंत मिश्र वस्तीचा हा मतदारसंघ आहे. काँग्रेसकडे असणारा हा मतवदारसंघ आपल्याकडे वळवून घेण्यात भाजपला यश आले ते नियोजनबद्ध निवडणूक प्रचार आणि संघटनेच्या बळावर. पुनर्रचनेपूर्वी अण्णा जोशी, त्यानंतर विजय काळे यांनी मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. मध्यंतरी दोन वेळा दिवंगत विनायक निम्हण यांनी त्यावर एकदा शिवसेनेचा, तर दुसऱ्या वेळी काँग्रेसचा झेंडा रोवला, पण त्यांना मोदीलाटेत पुन्हा गड राखता आला नाही. २०१४ मध्ये विजय काळे आणि २०१९ मध्ये सिद्धार्थ शिरोळे यांच्या रूपाने सलग दोन वेळा भाजपने शिवाजीनगर मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे भाजप या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवणार का, याबाबत उत्सुकताआहे.
भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी
२०१९ मध्ये लोकसभेला अनिल शिरोळे यांना खासदारकीची दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी सिद्धार्थ यांना शिवाजीनगरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. नगरसेवक म्हणून ते कार्यरत होतेच. पण, तरीही त्यांची बरीच दमछाक झाली. काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी त्यांना चांगली लढत दिली. यंदाही पुन्हा हाच सामना होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी, भाजपत उमेदवारीवरून वाद होण्याची चिन्हे आहेत. याचे कारण मागील वेळची कमी मतांची आघाडी हेच आहे. त्यामुळे भाजपत इच्छुकांची संख्या फार मोठी आहे. भाजपमधील इच्छुकांची संख्या पाहता पुन्हा उमेदवारीसाठी सिद्धार्थ यांना बरीच कसरत करावी लागेल. विविध राज्यातील निवडणूक प्रचारात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील भाजपचे नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याचा त्यांना उपयोग होईल.
महाविकास आघाडीला घ्यावी लागणार मेहनत
दत्ता बहिरट, मनीष आनंद, माजी आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण, राज निकम यांच्यासह अनेकजण शिवाजीनगरमध्ये काॅंग्रेसकडून इच्छुक आहेत. जागावाटपामध्ये महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, असे सध्या चित्र आहे. त्यांचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) हे फार हरकत घेतील असे दिसत नाही. पण, काँग्रेसला या मतदारसंघात जिंकायचे असेल तर तिन्ही पक्षांना मेहनत घ्यावी लागेल. मागील निवडणुकीनंतर संघटना स्तरावर काँग्रेस पक्ष जवळपास बाद झाल्यासारखाच आहे. ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांमध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा आहे. नाराजी, गटबाजी यामुळे संपूर्ण पक्ष पोखरला गेला आहे. सक्षम पर्याय म्हणून मतदारांसमोर जाताना पक्षाची घडी नीट असावी लागते. शिवाजीनगरबाबत निदान आता तरी अशी परिस्थिती नाही. काँग्रेसची हीच स्थिती ओळखून महाविकास आघाडीतील अन्य पक्ष विशेषत: शिवसेना ही जागा मिळावी, यासाठी आग्रही असेल. त्यांच्याकडे आता उल्लेखनीय नाव नसले तरी ही परिस्थिती ऐनवेळी बदलू शकते. काँग्रेसला वाटाघाटीत शिवाजीनगर मतदारसंघ पदरात पाडून घ्यावा लागेल.
अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
मिश्र मतदारसंघ असल्यामुळे दलित, मुस्लिमांसह अल्पसंख्याकांची मते निर्णायक ठरू शकतात. येथे अल्पसंख्याक मतदार लोकसंख्येच्या तुलनेत कमी असले तरी ते राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आणि जागरूक असल्यामुळे त्यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी आटोकाट प्रयत्न करणार हे निश्चित. एकूणच देश आणि राज्यपातळीवर भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) कट्टर हिंदुत्वाची भूमिका, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष विचारांचा दावा यांच्यात येथे लढत आहे. अल्पसंख्याक मतदार यापैकी कोणाला पसंती देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभेतील मतांमुळे उंचावला काँग्रेसचा आत्मविश्वास
यंदा एप्रिल-मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शिवाजीनगरमधून ६८,१५२ तर काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ६४,८१५ मते मिळाली होती. २०१९ च्या विधानसभेला ५,१२४ मतांच्या निसटत्या फरकाने जिंकून आलेले सिद्धार्थ शिरोळे लोकसभेला तेवढेही मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही. येथून भाजपला ३,३३७ मतांची अल्प आघाडी मिळाली होती. २०१९च्या विधानसभेला काॅंग्रेसच्या दत्ता बहिरटांच्या ५३,६०३ मतांच्या तुलनेत ५८,७२७ मते घेत शिरोळे विजयी ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर यावेळीलोकसभेला धंगेकर यांना मिळालेली ६५ हजारांच्या घरातील मते पाहता विधानसभेसाठी काॅंग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे.
मतदारसंघातील प्रमुख समस्या
-घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन
-शौचालयांची संख्या वाढविण्याची गरज
-पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी पर्याय
-जुना पुणे-मुंबई रस्ता, गणेशखिंड रस्ता, खडकी स्टेशन रस्ता, सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी
मतदारसंघातील प्रकल्प
-झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए)
-पिण्याच्या पाण्याची
-२४ X ७ योजनेची अंमलबजावणी
-शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो
-फ्लायओव्हर ब्रीजचे काम
-खडकी नवीन रेल्वे भुयारी मार्ग
मतदारसंघात पाच वर्षांमध्ये विविध प्रकल्प आणि योजनांसाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च केला. यापैकी सर्वाधिक ६५ कोटींचा निधी महायुतीच्या सत्ताकाळात आणला. लोकसभेत जरी लीड कमी असला आणि इच्छुकांची संख्या जास्त असली तरी विधानसभेत महायुतीच्या वतीने मी पुन्हा विजय मिळवणार असल्याचा विश्वास आहे. मतदारसंघातील जनता मला त्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी पुन्हा एकदा देतील, याची खात्री आहे.
- सिद्धार्थ शिरोळे, भाजप आमदार
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून यावेळी मी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर आग्रह आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत गंभीरपणे विचार करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑफर दिली आहे. परंतु अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.
- सनी निम्हण, इच्छुक उमेदवार
विधानसभा मतदारसंघात खूप सुधारणांना वाव आहे. येथे सुविधांची कमतरता आहे. माझ्या उमेदवारीबाबत काँग्रेस हायकमांड जो निर्णय देईल, तो मान्य असेल. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा उपाध्यक्ष म्हणून काम करताना परिसरातील नागरिकांचे प्रेम मिळाले. यावेळी मी विधानसभा लढवावी, अशी त्यांच्यासह शिवाजीनगरमधील नागरिकांची इच्छा आहे. शिवाजीनगर मतदारसंघात बहुसंख्य महाविद्यालये असल्याने मला वाटते की ग्रामीण भारतातून आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह आणि राहण्याच्या सुविधांची गरज आहे. ई-लायब्ररी, पाणी, वाहतूक कोंडी आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या मतदारसंघातील प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडवण्याला माझे प्राधान्य असेल.
- मनीष आनंद, काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार
माझी पाटी कोरी असली तरी दहा वर्षांपासून गणेशोत्सव, नवरात्र, पालखी, शिवजयंती, ईद, उरुस, छट पूजा, पोंगल, आरोग्य शिबिरे, शिधावाटप, शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून मी शिवाजीनगरमधील सर्व धर्मीय नागरिकांच्या नियमित संपर्कात आहे. सर्वधर्मसमभाव हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्या परंपरेचा पाईक म्हणून मी यावेळी पक्षाच्या चौकटीत राहून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. शिवाजीनगरमधील मतदारांना कायदेशीर मार्गाने वाटचाल करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. माझ्या भागातील नागरिकांना सर्वांगीण विकासाच्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा आहे.
- राज निकम, काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार