मतसंग्राम 2024: वडगाव शेरी मतदारसंघात वाढली चुरस

पुणे: आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप होण्याआधीच वडगाव शेरी मतदारसंघात दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Mon, 23 Sep 2024
  • 03:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आमदार सुनील टिंगरे-जगदीश मुळीक यांच्यात महायुतीतून उमेवारीसाठी स्पर्धा; माजी आमदार बापू पठारे शरद पवार गटात परतल्याने वाढली निवडणुकीची रंगत

पुणे: आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत जागावाटप होण्याआधीच वडगाव शेरी मतदारसंघात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (अजित पवार गट) विद्यमान आमदार असल्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ त्यांनाच सोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही विधानसभा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यातच माजी आमदार बापू पठारे यांनी हे भाजपमधून स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटात परतल्यामुळे वडगाव शेरीत राजकीय रंगत वाढली आहे. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीवरून महायुतीत तिढा निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.

पठारे यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला असला तरी या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे या जागेच्या हक्कावरील आघाडीतही तिढा होऊ शकतो. हा मतदारसंघ पुरोगामी विचारांना मानणारा  आहे. त्यामुळेच येथे आम्हाला अधिक पसंती दिली जाते, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केला जातो. मात्र, गेल्या १० ते १५ वर्षांत वडगाव शेरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्यानंतर येथे भाजपला मानणारा मतदारवर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा थेट परिणाम २०१४ च्या निवडणुकीत मतदारांनी आपले दान भाजपचे मुळीक यांच्या बाजूने टाकण्यात झाला. त्यानंतर मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत वाढले आहेत. असे असले तरी २०१४ नंतर २०१९ मध्ये येथील मतदारांनी भाजपला नाकारत एकत्रित राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडले होते.  २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुळीक यांनी एक लाखाच्या मताधिक्याने जिंकून येण्याचा दावा केला होता. मात्र टिंगरे यांनी त्यांना ‘कांटे की टक्कर’ देत ४,९७५ मतांच्या निसटत्या फरकाने बाजी मारली होती.  

टिंगरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मतदारसंघात 'जनसन्मान' यात्रा आणत पवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. असे असले तरी माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, सुरेंद्र पठारे यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र शरद पवार गटात बापू पठारे यांनी प्रवेश केल्याने निवडणुकीचे गणित बदलले आहे. माजी नगरसेवक महेंद्र पठारे हेदेखील निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते, पण त्यांनीही शरद पवार गटात प्रवेश केल्यावर आपला उमेदवारीचा दावा सोडल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर बदलते गणित
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ १५ हजारांचे मताधिक्य मिळाले. २०१९ च्या लोकसभेला येथून भाजपच्या उमेदवाराने ५७ हजार मतांची आघाडी घेतली होती. सगळे आजी-माजी आमदार, पदाधिकारी एका बाजूला असतानादेखील यंदा येथून काँग्रेसला मिळालेली लक्षणीय मते विचार करायला लावणारी आहेत. हा मतदारसंघ आत्तापर्यंत धक्कादायक निकाल देणारा ठरलेला आहे. २०१९ मध्ये लोकसभेत मोठे मताधिक्य मिळूनसुद्धा भाजपला विधानसभेला पराभव पत्कारावा लागला होता. यावेळी लोकसभेला महायुतीला मताधिक्य मिळाले असले, तरी २०१९ च्या तुलनेत ते तब्बल ४२ हजारांनी घटले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीचा कस लागणार, हे स्पष्ट आहे. मात्र, त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठीदेखील वाटचाल सोपी नाही.  

मविआमध्ये पवार गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच
महाविकास आघाडीत आता या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. गत विधानसभेला या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता. त्यामुळे या मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील, असा दावा पवार गटाचा आहे. पठारे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण आता या गटाकडून भीमराव गलांडे, रमेश आढाव, आशिष माने, सुनील खांदवे या इच्छुकांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे शहरात किमान दोन तरी जागा शिवसेनेला मिळाव्या, असा ठाकरे गटाचा आग्रह आहे. याउ दोनमध्ये त्यांनी वडगाव शेरी मतदारसंघाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे मविआतून ही जागा नेमकी कोणाला जाणार, याकडे लक्ष लागून आहे.   ठाकरे गटाला ही जागा गेल्यास माजी नगरसेवक संजय भोसले, नितीन भुजबळ, सतीश मुळीक यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

मतदारसंघातील मुख्य समस्या
-नगर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडीने नागरिक त्रासले आहेत.
-अनेक वर्षांपासून ड्रेनेजलाईन न बदलल्याने ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून घाण पाणी वाहते.
-खराडी, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा या भागांसह इतर भागात पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा
-वडगाव शेरी मतदारसंघात प्रदूषण वाढत आहे. तसेच नदीतील प्रदूषण वाढत असल्याने चिंतेत भर
-फक्त आयटी परिसर आणि मोठ्या सोसायट्यांमध्ये विकासकामे झाली असे दिसून येते .पण वस्त्यांमध्ये अनेक समस्या
-खराडी बायपास चौकात उड्डाणपुलाचे काम बाकी
-पर्यायी रस्त्यांचा विकास रखडला
-खराडी ते शिवणे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडला
-आयटी पार्क असले तरी नोकरीसाठी वणवण फिरण्याची तरुणांवर वेळ

मतदारांच्या अपेक्षा काय? 
-रामवाडी ते वाघोली, खराडी गावात हवी महामेट्रो
-आळंदीपर्यंत महामेट्रोचा विस्तार करावा
-आयटी पार्कमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या
-सांस्कृतिक केंद्र (नाट्यगृह)
-पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे
-रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण हटवावे
-वाहतूक कोंडीतून मुक्ती
-विकासकामे वेगाने व्हावीत
-विश्रांतवाडीतील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे
-विमाननगर ते शिरूरपर्यंत थेट उड्डाणपूल

विकासकामे हाच निवडणुकीचा अजेंडा : आमदार सुनील टिंगरे
वडगाव शेरी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार हा मी केलेल्या विकास कामांवरच असणार आहे. निवडणुकीत समोरचा उमेदवार कोण असेल याचा कधीच विचार करत नाही. महायुती असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. मतदारसंघात एकूण १,४०० कोटी रुपयांचे कामे सुरू आहेत. त्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाला मान्यता मिळाली आहे. भामा आसखेड धरणाचा प्रश्न मार्गी लागला. लोहगावमध्ये सर्वात मोठा ड्रेनेज प्रोजेक्ट राबवला.  २८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविली. शास्त्री  चौकातील उड्डाणपुलाला मान्यता घेतली आहे. खराडीत ऑक्सिजन पार्क नावाने गार्डन उभारले. येरवड्यातील भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावला. कोविडकाळात नागरिकांसाठी मदत योजना राबविली. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीआरटी मार्ग काढण्याची नागरिकांची मागणी होती. ती भूमिका लक्षात घेत या मार्गावरील निम्या मार्गावरील बीआरटी काढली. रामवाडी ते शिरूरपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला. मतदारसंघातील सोसायट्यांच्या विकासकामांसाठी नवे धोरण तयार केले असून त्याला लवकरच मान्यता मिळेल. रस्ता, वीज, पाणी प्रश्न मार्गी लावले. शासकीय कार्यालये मतदारसंघात आणली. आयटीआयचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामे हाच अजेंडा असणार आहे. निवडणुकीची तयारी केली आहे असे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी सांगितले.  

भाजपने लढावे, अशी मतदारांची इच्छा : माजी आमदार जगदीश मुळीक
वडगाव शेरी मतदारसंघात भाजपची संघटना मोठी असून तळागाळापर्यंत काम करणारे कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघाचा आमदार हा भाजपचा असावा, अशी येथील मतदारांची इच्छा असून निवडणूक लढविण्याचा त्यांचा आग्रह आहे. मी आमदार असताना अनेक विकास कामे केली आहेत. मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारांच्या हिताला प्राधान्य दिले. क्रीडांगणे, गार्डन उभारले आहेत. लोहगाव परिसरात १०० बेडच्या रुग्णालयाचे काम मार्गी लावले. येरवडा गोल्फ चौकात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून घेतले. मतदारसंघात २५० हून अधिक ओपन जिम उभारल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भामा आसखेड धरणाचे काम पूर्वत्वास नेले. या मतदारसंघात वाहतूक कोंडीसह पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या पाहिजे. मतदारसंघात विकासकामे वेगाने व्हावी, यासाठी भाजपचा उमेदवार असावा, अशी मागणी मतदारांची असल्याने आम्ही उमदेवारीवर दावा केला आहे. पारदर्शक कारभार आम्ही केला असल्याने त्याला लोकांचे समर्थन आहे, असा दावा भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केला.

जनमताची साथ, जिंकण्यासाठी लढणार : माजी आमदार बापू पठारे
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी नागरिकांची मागणी होती. मतदारांना काम करणारा उमेदवार हवा आहे. मला मतदारसंघाच्या कानाकोपऱ्याची माहिती आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून राजकारणात असून जनतेची कामे करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मतदारांचा पाठिंबा मिळत आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परतल्याने नागरिकांनी स्वागत केले आहे. मी आमदार असताना ३६८ कोटी रुपयांची पाणी योजना आणली होती. गेल्या दहा वर्षात दोन आमदारांनी त्याकडे पुन्हा लक्ष दिले नाही. लोहगाव परिसरात १२ वर्षांपूर्वी शंभर बेडच्या रुग्णालयासाठी मान्यता घेतली होती. पण त्याचे पुढे काय झाले? याच भागात तरुणांना आवडती कौशल्ये आत्मसात व्हावी, यासाठी आयटीआयचे कोर्सेस सुरू करण्याकरिता सहा एकर जागा आरक्षित केली आहे. मात्र, त्या जागेवर अद्याप काहीही झालेले नाही. जनमताची भक्कम साथ असल्याने समोर कोणता उमेदवार असणार, याचा विचार करत नाही. निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याचा विश्वास माजी आमदार आणि महाविकास आघाडीतर्फे इच्छुक बापू पठारे (Bapu Pathare) यांनी व्यक्त केला.  खराडीत येत्या २७ सप्टेंबरला शरद पवार यांची सभा होणार आहे. यावेळी अनेक नेते, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest