पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच; थोरातांच्या विधानामुळे मविआत मतभेदाचे सावट

मुंबई: राज्यात विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यक्रम सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे विधान केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 20 Sep 2024
  • 02:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

'उबाठा'च्या गोटात पुन्हा अस्वस्थता

मुंबई: राज्यात विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) कार्यक्रम सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे विधान केले आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असा आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गोटात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरून थोडीशी माघार घेतलेल्या उबाठा गटात चिंता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीतच बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची (Congress) कोकण विभागामध्ये जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याचवेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत विधान केले आहे. ते म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगले काम करण्याचे आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, याची मला शंभर टक्के खात्री आहे.

राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahayuti ) नेत्यांच्या सभा, मेळावे आणि आढावा बैठका सुरू आहेत. या सभांच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरै सुरू आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असले तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून प्रचंड मतभेद असल्याचे चित्र समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रि‍पदाचा (Chief Minister) चेहरा जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने अनेकदा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील नेत्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणि काँग्रेसला आवाहन करत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो, असे म्हटले होते. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे अनेकदा बोलून दाखवले होते. एवढेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याचे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. दरम्यान, यानंतर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest