रणसंग्राम २०२४: अजितदादांच्या प्रतिष्ठेसाठी प्रदीप कंद यांची घरवापसी?

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान दिले आहे. अजितदादांची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद

Ajit Pawar

अजितदादांच्या प्रतिष्ठेसाठी प्रदीप कंद यांची घरवापसी?

शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी, खासदार अमोल कोल्हे यांना देणार आव्हान

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आव्हान दिले आहे. अजितदादांची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (Pradip Kand) राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहेत. 

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणू. अजित पवार जे बोलतो, ते करतोच असे आव्हान अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांना दिले होते. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार गेल्या वेळी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला होता, त्यालाच तो लोकसभा मतदारसंघ मिळणार  असल्याने शिरूरची जागा अजित पवार गटालाच मिळण्याची शक्यता आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांना धक्का देत निवडणूक जिंकली होती. त्यामुळे या जागेवर माजी खासदार शिवाजीराव आढळरावही दावा करत आहेत. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चाही होती. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांना म्हाडाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आढळराव यांच्याबरोबर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कन्या पूर्वा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, माजी आमदार विलास लांडे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, आता अचानक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचे नाव समोर आले आहे. 

भाजपने (BJP) परवानगी दिल्यास आपण अजित पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास तयार आहोत, असे कंद यांनी सांगितले. बारामतीपाठाेपाठ शिरूरमध्येही शरद पवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हेच उमेदवार असणार हे स्पष्ट झाले आहे. मतदारसंघात विविध ठिकाणी शिवपुत्र संभाजी या नाटकाचे प्रयोग करून डॉ. कोल्हे यांनी प्रचारही सुरू केला आहे. 

यंदाची निवडणूक राजकीय पक्षांची लढाई नाही. ही तत्त्व आणि विचारसरणीची लढाई आहे. मी नव्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. आमची इंडिया आघाडी सर्वसामान्यांना सोबत घेऊन पुढे जात आहे.  शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न मांडत आहे.  विरोधी पक्षाकडून कोण रिंगणात आहे त्याने काही फरक पडत नाही. माजी खासदार आढळराव  पाटील यांचा मी आदर करतो.  प्रदीप कंद हे माझे जिवलग मित्र आहेत. लोकसभेत आपला प्रतिनिधी कोण असेल हे लोकच ठरविणार आहेत. 

- खासदार डॉ. अमोल कोल्हे

पूर्वा वळसे-पाटील, आढळराव यांना विरोध

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अशोक पवार वगळता पाचही आमदार महायुतीचे आहेत. यापैकी काहींचा पूर्वा वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळेच प्रदीप कंद यांच्या रूपाने नवीन चेहरा शोधला जात असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचेही नाव चर्चेत होते. अजित पवार कुटुंबाचे या मतदारसंघातील कार्यक्रम वाढले होते. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवार विरोधात असताना पार्थला उतरविण्याची अजित पवार यांची तयारी नसल्याची चर्चा आहे. 

भाजपने परवानगी दिल्यास लढणार

मी भारतीय जनता पक्षाचा शिरूर विधानसभेचा अध्यक्ष आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीने या मतदारसंघात लढण्यास सांगितले तर मी लोकसभा निवडणूक लढवीन. याबाबत मी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील महायुतीचे  सर्व आमदार सकारात्मक आहेत. भारतीय जनता पक्षानेही सकारात्मक संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होईल. कोणत्या पक्षासाठी नव्हे तर मी महायुतीच्या विजयासाठी लढणार आहे.- प्रदीप कंद

प्रदीप कंद अजित पवारांचेच!

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असतानाही प्रदीप कंद हे अजित पवार यांचे विश्वासू मानले जात होते. त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, शिरूर-हवेली मतदारसंघातील राजकीय गणितात आमदार अशोक पवार यांचे त्यांच्यापुढे आव्हान होते.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०१४  मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२२ मध्ये झालेल्या पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कंद यांनी भाजपकडून मैदानात उडी घेतली. त्यावेळी कंद यांच्या पराभवासाठी स्वतः अजित पवार यांनी दंड थोपटले होते. कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले होते.  कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा पराभव केला. कंद यांचा हा विजय अजित पवार यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर हेच कंद आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest