रणसंग्राम २०२४: ‘सत्तेचा उन्माद करणाऱ्या मोदींचा पराभव करा’ - शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे. सत्तेचा उन्माद काय असतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवले आहे. त्यामुळे मोदींचा पराभव करण्यासाठी तयार राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Lok Sabha Election 2024

‘सत्तेचा उन्माद करणाऱ्या मोदींचा पराभव करा’ - शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे, बारामती, शिरूरच्या ‘मविआ’ उमेदवारांचे अर्ज दाखल

देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे. सत्तेचा उन्माद काय असतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवले आहे.  त्यामुळे मोदींचा पराभव करण्यासाठी तयार राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे  अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. 

महाविकास आघाडीचे पुण्याचे रवींद्र धंगेकर, बारामतीच्या सुप्रिया सुळे, शिरूरचे डॉ. अमोल कोल्हे या उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या  महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी, भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण,  बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी यावेळी उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकरी, महिला, रोजगाराबाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. २०१५ मध्ये पेट्रोल ७१ रुपये होते.  आज ३ हजार ६५० दिवसांनी  पेट्रोल १०६ रुपये झाले. ४१० रुपयांचा सिलेंडर ११६० रुपये झाला आहे. तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार होते.  उलट दहा वर्षांत नोकऱ्या कमी झाल्या. आता मोदींना सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. मोदींवर टीका केली म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालचे तीन मंत्री तुरुंगात गेले. 

राज्यकर्त्यांनी मागची दहा वर्षे जनतेची फसवणूक केली आहे. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. महिलांवरचे अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आले. मनमोहन सिंग यांनी सत्ता सोडली तेव्हा पेट्रोलचे दर ७१ रुपये लिटर होते. मोदींनी आश्वासन दिलं होतं ५० दिवसांत पेट्रोलच्या किमती ५० टक्क्यांनी कमी करतो. आज ३ हजार ६५० दिवस झाले हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आत्ता पेट्रोलचा दर १०६ रुपये लिटर झाला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार पळाले असले तरी मतदार त्यांच्या जागी आहेत. जनता त्यांना जागा दाखवून देईल. सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतके दिवस मोठ्यांचा मान म्हणून ग्रामपंचायत, कारखाना, जिल्हा परिषद, दूधसंघ यामध्ये लक्ष घातले नाही. घरातला मोठा माणूस जर ते करतो आहे तर त्याला मदत करावी असे संस्कार माझ्यावर आहेत. आता मी सगळ्यांना सांगू इच्छिते की लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल, त्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना, सोसायटी, महापालिका ज्या निवडणुका होतील. त्यात महाविकास आघाडी ताकदीने लढणार आहे.  माझा कार्य अहवाल जर तुम्ही वाचला तर जे सगळे टीका करणारे मलाच मतदान करतील याची मला गॅरंटी आहे. हा शब्द देते म्हणून गॅरंटी आहे, तसली गॅरंटी नाही. आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन बोलणार  नाही. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे.

'धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या'

आमच्या विरोधात १८ वर्षांत जे बोलले नाही ते आज आमच्या विरोधात वैयक्तिक टीका करत आहेत. ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे. लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. या सगळ्यांना मी सांगते, जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला माझा नंबर द्या. कारण ते (अजित पवार) ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोरच मी आणि अमोलदादा म्हणजे अमोल कोल्हे अगदी निडरपणे भाषण करतो. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest