संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हाचे आज वाटप करण्यात आले. त्यात अठरा अपक्षांचा देखील समावेश आहे. ३३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया मंगळवारी पार पडली असून निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी चिन्हांचे वाटप जाहीर केले.
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेद्वारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९० मुक्त- चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडली.
चर्चेतील पाटील अन् गरबडे यांना मिळाले चिन्ह
उमेदवारांपैकी नाम साधर्म्यामुळे चर्चेत राहिलेले संजोग पाटील आणि चिंचवडमध्ये मंत्र्यांवर केलेल्या शाईफेक प्रकरणी राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले मनोज गरबडे यांनी अपक्ष अर्ज भरले होते. त्यापैकी पाटील यांना चिमणी तर, गरबडे यांना शिवणयंत्र चिन्ह मिळाले आहे.
वंचित पक्षाला ऑटोरिक्षा, तर अन्य एकाला तुतारी
मावळमध्ये ऐनवेळी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या महिला उमेदवाराला ऑटो रिक्षा हे चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, तुतारी हे चिन्ह काही उमेदवारांनी मागितले होते. त्यापैकी अपक्ष उमेदवार मारुती कांबळे यांना ते चिन्ह देण्यात आले. तसेच, इतर १.१ राज्यस्तरीय व राजकीय पार्टीला त्यांच्या ३ चिन्हांच्या मागणीनुसार एक चिन्ह मिळाले आहे.