पार्थ पवारांना मोदींसारखी सुरक्षा आणि दोन रणगाडे द्यायला हरकत नाही; रोहित पवारांचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. याबद्दल रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पार्थ पवार यांना खरं तर झेड दर्जाची सुरक्षा पुरवायला हवी होती.

संग्रहित छायाचित्र

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे.  याबद्दल रोहित पवार (Rohit Pawar) यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पार्थ पवार यांना खरं तर झेड दर्जाची सुरक्षा पुरवायला हवी होती. जी सुरक्षा पंतप्रधान मोदींना आहे, त्याच प्रकारची द्यायला हवी होती.’’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्याला सुरक्षा पुरवतात, नेत्यांच्या मुलांना, आमदारांना सुरक्षा पुरवतात पण जिथं कोयता गँग आहे, सामान्य लोक अडचणीत येतात, गोळीबार होतो, महिलांवर अत्याचार होतो त्याबद्दल ते काहीच करत नाही असे म्हणत त्यांनी फडणवीस  यांच्यावरही टीका केली.

रोहित पवार पुढे म्हणाले, ‘‘मला वाटतं पार्थ पवार यांच्या मागेपुढे दोन रणगाडेच द्यायला हवे. कारण लोक महायुती आणि भाजपच्या विरोधात आहेत. तसेच भाजपचा नाराज कार्यकर्तासुद्धा काहीही करू शकतो. त्यामुळे दोन रणगाडे द्यायला काही हरकत नाही.’’

पार्थ पवार (Parth Pawar) बारामतीत प्रचारासाठी फिरत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते संवाद साधत आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने पवार कुटुंबात काही प्रमाणात नाराजी आहे. तसेच शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग बारामतीत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती.

दरम्यान,अजित पवार हे पार्थ यांचा पराभव विसरले असतील. परंतु पार्थ यांचा २०१९ चा मावळ लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव मी विसरलो नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest