ठाकरे-शेट्टी यांचे बिनसले!
मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (Mavikas Aghadi) (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची बुधवारी घोषणा केली. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी कल्याण, जळगाव, पालघर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्यासह करण पवार आणि इतरांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरेंनी उमेदवारांची घोषणा केली.हातकंणगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांना ठाकरे पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. मात्र, शेट्टी आणि ठाकरे यांची चर्चा अयशस्वी झाल्यावर ठाकरे यांनी शेट्टी यांच्याविरोधात सेनेचा उमेदवार जाहीर केला आहे. तसेच जळगावमध्ये खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्याऐवजी करण पवार यांना उमेदवारी देत धक्कातंत्र वापरले आहे.
जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये वैशाली दरेकर (कल्याण), सत्यजीत पाटील (हातकणंगले), भारती कामडी (पालघर) तर करण पवार (जळगाव) यांचा समावेश आहे. आम्ही वाटाघाटीत ठरल्याप्रमाणं मुंबईतील चार जागा आधीच जाहीर केल्या आहेत. मुंबई उत्तरच्या जागेसाठी आम्ही मित्र पक्षाला विचारतो आहे. जर त्यांनी तेथे उमेदवार दिला नाही तर आम्ही त्या जागेवरही उमेदवार जाहीर करु, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जळगावमधून शिवसेनेकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर होईल असे वाटत होते. उद्धव ठाकरेंनी धक्कातंत्र अवलंबत करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. करण पवार यांचे नवा खुद्द उन्मेष पाटील यांनीच सुचवल्याचे यावेळी ठाकरेंनी सांगितलं. करण पवार हे उन्मेष पाटलांचे कट्टर समर्थक आहेत. पारोळा-एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे करण पवार हे नातू आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते डॉ. संतोष पाटील यांचे ते पुतणे आहेत. करण पवार यांनी पारोळा नगरपालिकेत भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. यापूर्वी एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी त्यांनी प्रयत्न केला होता. मराठा समाजाचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे.
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी उन्मेष पाटील म्हणाले, माझी लढाई आत्मसन्मानासाठी आहे. अवहेलना झाल्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली आहे.
मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही. बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही. ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. राजकारणात काम करताना मान सन्मान नको , पद नको, पण स्वाभिमान सांभाळला जात नसेल, अवहेलन केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही. भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अवहेलना होत असल्यानं वेगळी भूमिका घेतली.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांना समजाविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याला फार यश आले नाही. वृत्तसंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.