संग्रहित छायाचित्र
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे परभणीत दाखल झाले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांची हत्या ही 'कस्टोडीयल डेथ' असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधींनी सूर्यवंशी हा तरुण दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री हे विधीमंडळात खोटे बोलले असा आरोप केला. राहुल गांधी यांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले. गांधी यांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले, राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये विद्वेष तयार करायचा, एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे. तेच काम गेली अनेक वर्षे सातत्याने ते करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे. हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलं आहे. महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे. न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातील सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचं कारण नाहीये. आणि तर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमुळे किंवा अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टीमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर कारवाई याप्रकरणात केली जाईल.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
मी नुकतीच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच ज्यांना मारहाण झाली त्यांची पण मी भेट घेतली. यावेळी मला काही फोटोज, व्हिडिओज तसेच पोस्ट मोर्टम रिपोर्ट दाखवण्यात आले. हा १०० टक्के पोलिस कोठडीतील मृत्यू आहे. पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. तसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधीमंडळात खोटे बोलले. या तरुणाला मारण्यात आले कारण तो दलित होता. तो संविधानचे संरक्षण करत होता. आरएसएसची विचारधारा ही संविधान संपवण्याची विचारधारा आहे. प्रकरणाचा तत्काळ तपास व्हावा. तसेच ज्यांचा यात सहभाग आहे त्यांना कडक शिक्षा मिळावी.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.