नाराज भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? अर्धा तास झालेल्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा?
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यांनी अजित पवारांसह पक्षातील इतर नेत्यांना देखील सवाल करत डावलण्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता छगन भुजबळांनी भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच वेगळा निर्णय घेणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहे. आज सकाळी भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर भुजबळांच्या नाराजीनाट्याला एक वेगळे वळण लागलं आहे. भुजबळ नेमका कोणता निर्णय घेणार? राज्यसरकार त्यांचा हट्ट पुरवणार? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे, त्याबाबत भुजबळांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
रविवारी झालेल्या ओबीसी बहुजन आघाडीच्या बैठकीनंतर आज सकाळी सागर बंगल्यावर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीसांच्या भेटीवर नेमकं काय म्हणाले भुजबळ
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्यासोबत पुतणे समीर भुजबळदेखील होते याची माहिती दिली. जवळपास ही चर्चा 40 मिनिट झाली. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तसेज नाराजी वर बोलताना भुजबळ म्हणाले, फडणवीस यांनी माझ मत समजून घेतलं. त्यांनी मला 8 -10 दिवस वेळ द्या अशी विनंती केली. शांततेमध्ये यावर मार्ग काढू. तसेच ओबीसीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. यासोबत ओबीसीच कोणतही नुकसान होणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेदरम्यान दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.