गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी त्यांच्या कुटुंबासह राज्यभरातून करण्यात येत आहे. तर एकीकडे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. सामाजित कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंडे विरोधात ट्विटरवर काही पुरावे सादर केले आहेत. दमानिया यांनी सादर केलेल्या पुरव्यामुळं आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंजली दमानिया यांचे नेमकं ट्विट काय?
अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणात सातत्याने आरोपी म्हणून नाव समोर येणाऱ्या वाल्मिकी कराड याच्याशी धनंजय मुंडे यांचे खास संबंध असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या संदर्भात काही पुरावेदेखील सादर केले आहेत.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा करत दमानिया यांनी सातबाऱ्याचे पुरावे दिले आहेत.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन !
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र
जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले
३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पण विरोधकांकडून या प्रकरणात धनंजय मुंडे यांना गोवल जात आहे. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी या हत्येप्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिकी कारड असल्याचा दावा करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या अर्थिक सख्य असल्याचे पुरावे सादर केले आहेत. तसेच, वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप करणयात आला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.