“असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे”, चांदणी चौक उद्घाटनावरून मेधा कुलकर्णींचा पुण्यातील भाजप नेतृत्वावर निशाणा

आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी, असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील भाजप नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 11 Aug 2023
  • 06:36 pm

चांदणी चौक उद्घाटनावरून मेधा कुलकर्णींचा पुण्यातील भाजप नेतृत्वावर निशाणा

माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही... पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी, असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील भाजप नेतृत्वावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपली कैफियत मांडली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस  यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला".

अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जीअमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.

साधे कोथरूडच्या मंडळ अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.  गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे.

एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. त्यांनी ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टॅग केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest