वसंत मोरेंच्या हाती 'मशाल'; म्हणाले, मी स्वगृही परतलोय
मनसे नंतर वंचितलाही सोडचिठ्ठी देत वसंत मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्यासह पुण्यातील मनसेचे तब्बल २३ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला.
यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, खूप दिवसांनी पाऊस आला असून आता वसंत देखील फुलला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे पुढे काय करतील अशा चर्चा होत्या. परंतु शेवटी ते मातोश्रीवरच येतील याची मला खात्री होती. मोरे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्यामुळे पुणे, खडकवासला परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरेंना मजबूत कार्यकर्ता मिळाला आहे. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेत आले आहेत. मोरे हे स्वगृही परतले आहे असे मी मानतो.
खासदार संजय राऊत यांच्यानंतर बोलताना वसंत मोरे म्हणाले, वयाच्या १६ व्या वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय पद मिळत नव्हते. मात्र १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होताच १९९२ मध्ये कात्रज येथे शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. त्यानंतर वयाच्या ३१ व्या वर्षापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघात उपविभाग प्रमुख पदांपर्यंत पोहोचलो. त्यानंतर मनसे सोबत गेलो. अनेक लोक म्हणतात की मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु मी स्वगृही परतलो आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे काय करतायेत याकडे आमचं लक्ष होतं. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते? सन्मान मिळतो का? तो अनुभव घेऊन अधिक परिपक्व होवून तुम्ही स्वगृही परतला आहात असे म्हणत त्यांनी मनसेवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना सोडल्याबद्दल वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांना शिक्षा झाली पाहीजे. शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे. तो जबाबदारी या अर्थाने घ्या. तसेच शिक्षा हीच की पूर्वीपेक्षा अधिक पटीने पुण्यात शिवसेना वाढली पाहीजे. ही तुमची जबाबदारी आहे, असे ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई त्यावेळी लढली. आता विधानसभा निवडणुकीत गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरोधात लढाई लढायची आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची ही लढाई असणार आहे. पुणे हे सत्ताबदलाचे केंद्र असायला पाहिजे. पुण्यात एकेकाळी शिवसेनेचे पाच आमदार होते. तो काळ मला पुन्हा आणायचा आहे असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांनी नाराज होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पुणे लोकसभेतून महाविकास आघाडीकडून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार, तसेच संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र पुण्यातून महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि पुण्यातून लोकसभा लढवली. मात्र रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे दोघांनाही भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.