मदनदास देवी यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरसंघचालकांनी घेतले दर्शन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटक आणि ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे पाच वाजता बंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. मदनदास यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेते पुण्यात दाखल झाले आहेत.
मदनदास देवी यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव पुण्यातील मोतीबागेत ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले होते.
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी मदनदास यांच्या पार्शिवाचे दर्शन घेतले. दरम्यान, मदनदास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले. आयुष्यातील जवळपास ७० वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले.