संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्राची आज सर्कस झाली आहे. राजकारणाच्या क्षेत्रात सध्या बोलल्या जाणाऱ्या भाषेला धरबंध राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नाठाळ राजकारण्यांचे कान धरून त्यांना वठवणीवर आणण्याचे, खडे बोल सुनविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे मत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकारणी व्यक्तींना साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांचे विचार ऐकायला बोलवावे, बोलायला नको असे सांगून पूर्वीच्या मराठी साहित्यिकांच्या अंगात, मनात मराठी बाणा रुजलेला दिसत होता, परंतु ती धमक आज कमी झालेली जाणवते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी (दि. 7) राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी राजमुद्रा व लेखणी असे बोधचिन्हाचे स्वरूप आहे. दिल्ली येथे दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत साहित्य संमेलन होत आहे. सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रकाश पागे, गुरय्या स्वामी, डॉ. शैलेश पगारिया आदी मंचावर होते.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहेत तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारत आहे. खरे तर महाराष्ट्रातील असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना जाळी नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे.
महाराष्ट्रात सध्या जे अध:पतन सुरू आहे, त्याला वृत्त वाहिन्या जबादार आहेत. राजकीय लोक जे बेताल वक्तव्य करतात, ते वृत्तवाहिन्या जसेच्या तसे प्रसारित करून इतरांना तसे बोलण्यास भाग पडतात. जेव्हा वाहिन्या हे दाखविणे बंद करतील, तेव्हा सगळे सुधारतील. त्यामुळे त्यांनी ते दाखविणे बंद करावे, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना केले आहे.
राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते. त्याला कोणाचेही बंधन राहीलेले नाही. त्यामुळे अशा गोष्ट होत असतात. साहित्यिकांनी त्यांना अधिकार वाणीने शिकवावे. साहित्यिकांनी सर्वांचे कान टोचले पाहिजे, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे. आम्ही बोललो तर ट्रोल होतो, असा विचार करू नका. साहित्यिकांनी राजकारणाला दिशा देण्याचे काम करावे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.