Politics : आदित्य ठाकरे आणि माझी एकत्र चौकशी करा, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आमदार नीतेश राणे यांचे आव्हान

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशीही त्याचा संबंध जोडला आहे. आपल्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. याबाबत ‘पुणे टाईम्स मिरर’च्या राजकीय संपादक शिखा धारिवाल यांनी नितेश राणे यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Omkar Gore
  • Sat, 16 Dec 2023
  • 05:03 pm
Politics : आदित्य ठाकरे आणि माझी एकत्र चौकशी करा, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आमदार नीतेश राणे यांचे आव्हान

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आमदार नीतेश राणे यांचे आव्हान

सुशांतच्या मृत्यूप्रकरणीही पुरावे असल्याचा दावा

-राजकीय संपादक शिखा धारिवाल

महाराष्ट्र सरकारने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांची टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे.  भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी आणि सार्वजनिक व्यासपीठावरही दिशा सालियनच्या गूढ मृत्यूमागे एका राजकारण्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशीही त्याचा संबंध जोडला आहे. आपल्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. याबाबत ‘पुणे टाईम्स मिरर’च्या राजकीय संपादक शिखा धारिवाल यांनी नितेश राणे यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे आणि माझी एकत्रित चौकशी करा. म्हणजे सत्य काय ते समोर येईल, असे आव्हान नीतेश राणे यांनी दिले आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘दिशाचा मृत्यू संशयास्पद होता आणि महाआघाडीचे सरकार या प्रकरणात कमालीचे घाबरले होते. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, जर हे फक्त आत्महत्या प्रकरण असेल तर तपासादरम्यान इतके महत्त्वाचे पुरावे कोणीतरी का नष्ट केलेइमारतीचे सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले? सोसायटीच्या व्हिजिटर एंट्री रजिस्टरमधून काही पाने का फाडली गेली८ जून २०२० रोजी ड्युटीवर असलेला सुरक्षारक्षक दिशाचा मृत्यू झाल्यानंतर गायब कसा झाला? या सगळ्याचा तपास विशेष तपास पथकाकडून होण्याची अपेक्षा आहे.’’

दिशासोबत ८ तारखेला आणि त्याच महिन्यात १३ तारखेला सुशांतसिंग राजपूतसोबत जे घडले त्याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह माझ्याकडे काही छायाचित्रे, व्हीडीओ आणि पेन ड्राईव्ह आहेत. यासंदर्भात मी एसआयटीला पत्र लिहिण्याचा विचार करत आहे. चौकशीसाठी मला बोलवा. माझ्याकडे जी काही कागदपत्रे आणि साक्षीदार आहेत, ते यंत्रणा तपासू शकतात. महाविकास आघाडी सत्तेत असताना दिशा सालियन प्रकरणातील तपास अधिकारी दोनदा बदलण्यात आला होता. दिशाच्या अंतिम शवविच्छेदन अहवालाबाबतही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे  इतर पुरावे आणि संशयितांची चौकशी व्हायला हवी होती. परंतु मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रत्यक्षात काहीही झाले नाही. सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पाठवण्यात आलेल्या बिहारमधील अधिकाऱ्यांनाही महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात येण्यास रोखले होते. सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूचा परस्परांशी संबंध आहे. त्यामुळे तपासाबाबत संशयाचे वातावरण आहे. ५ जूनच्या रात्री दिशाच्या फ्लॅटवर कोण उपस्थित होते, याचे मोबाईल टॉवर लोकेशनद्वारे पुरावे आहेत. दिशाचा कथित बॉयफ्रेंड रोहन राय याची चौकशी केल्यावरही मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे, असा दावादेखील नीतेश राणे यांनी केला.

दिशाने आत्महत्या केली नाही, तिची हत्याच झाली, असा दावा करून नीतेश राणे म्हणाले, ‘‘या कटात सहभागी असलेल्या काही लोकांना मी ओळखतो. माझी अशी माहिती आहे की, ८ जूनच्या रात्री आपल्यासोबत जे काही घडले ते दिशाने फोन करून सुशांतसिंगला सांगितले होते.  त्यामुळे सुशांत खूप अस्वस्थ झाला होता. यावर जाहीरपणे बोलण्याचीही त्याची इच्छा होती. दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी सुशांतसिंग राजपूत जाहीरपणे बोलण्याची भीती यातील दोषींना वाटली. त्यामुळे १३ जून रोजी सुशांतसोबतचा प्रकार घडला. सुशांतचे शवविच्छेदन करणारे रूपकुमार शाह यांनीही ही आत्महत्या नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे.’’

दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूवरून नीतेश राणे राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधक करत आले आहेत. ही बाब निदर्शनास आणून दिली असता राणे म्हणाले, ‘‘विरोधकांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा मी केलेल्या आरोपांवर बोलावे. सत्तेचा गैरवापर करून हे प्रकरण दाबले गेले, असा माझा आरोप आहे. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ते का देत नाहीत? आम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आदित्य ठाकरे यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणून सत्य दडपले गेले. पण आता दोषींना शिक्षा व्हायलाच हवी. हा केवळ सुशांत आणि दिशा यांचा प्रश्न नाही तर भारतभरातून मुंबईत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या तरुणांचा प्रश्न आहे. मुंबईत त्यांना पाठवायला त्यांचे पालक घाबरत आहेत. या विषयासंदर्भात ‘पुणे मिरर’ टीमने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्याशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

राजकीय चिखलफेक करण्यासाठी कपोलकल्पित कथा : संजय राऊत

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाकडून होणाऱ्या चौकशीबाबत खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,  ‘‘या सर्व कपोलकल्पित  कथा आहेत. यातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, पण आम्ही अजिबात घाबरत नाही.  वो कहते है ना, जब कुछ गलत किया नहीं तो डर कैसा?’’

कोण होती दिशा सालियन?

दिशा सालियन दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर होती.  तिने ८ जून २०२० रोजी मुंबईतील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूच्या एका आठवड्यानंतर सुशांत यानेही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणातील गूढ तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दडपून ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला. काही नेत्यांनी दिशाची  हत्या झाल्याचा आरोप केला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणाशी जोडले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest