माढ्यात शरद पवार मोदींवर बरसले; जाहीर सभेत ऐकवून दाखवले मोदींचे 'ते' भाषण

पंतप्रधान मोदी यांच्या २०१४ च्या भाषणातील 'मतदानाला जाताना घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा' हे वाक्य भरसभेत ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली.

Sharad Pawar

माढ्यात शरद पवार मोदींवर बरसले

पंतप्रधान मोदी यांच्या २०१४ च्या भाषणातील 'मतदानाला जाताना घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा' हे वाक्य भरसभेत ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. पवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित  केलेल्या सभेत माढा लोकसभा मतदारसंघात आज (बुधवार) बोलत होते. 

आपल्या जाहीर भाषणात  शरद पवार यांनी मनमोहन सिंह पंतप्रधान असताना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली केलेले भाषण ऐकवून दाखवले. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदानाला जाताना घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा असे आवाहन केले होते. तसेच पंतप्रधान  हे महागाईमधील 'म' बोलण्यासही तयार नाही. अशी टिका त्यावेळी मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्यावर केली होती. या भाषणाची आठवण करून देत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशी टिका केली. तसेच सत्ता त्यांच्याकडे असूनही ते आम्हालाच शिव्या घालत आहेत. गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केले? असा प्रश्न  पवार यांनी जाहीर सभेत विचारला. 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य माणसाच्या अधिकारांवर संकट येण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उत्तम काम केले. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी उत्तम काम केले. परंतु केंद्र सरकारचे त्यांना सहकार्य लाभले नाही म्हणून केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टिका केली आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदी यांचे कामकाज हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची टिका पवार यांनी यावेळी केली. 

पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजप दहा वर्षे सत्तेत आहे. या काळात पंतप्रधान मोदी यांनी अनेक आश्वासने दिली. ५० दिवसांच्या आत महागाई कमी करणार. ५० दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत ५० टक्क्यांनी खाली आणणार असे आश्वासन मोदी यांनी दिले होते. २०१४ साली पेट्रोलची किंमत ७१ रुपये होती ती वाढून २०२४ साली १०६ रुपये झाली. घरातील गॅस सिलिंडर स्वस्तात देवू असा शब्द नरेंद्र मोदी यांनी दिला होता. २०१४ साली गॅस सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती. आता ११६० रुपये आहे. आयएलओ या संघटनेने देशातील बेकारीचा अभ्यास केला. त्यांच्या मते देशात मोठी बेरोजगारी आहे. तुम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि आम्हाला शिव्या घालता. परंतु मागील दहा वर्षे तुम्ही सत्तेत असताना काय केलं? असा प्रश्न यावेळी पवार यांनी केला. तसेच,नोटबंदीचा लोकांना त्रास झाला. लोकांना दोन तीन दिवस रांगेत उभं राहावं लागलं अशी टिका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest