सत्ता व्यक्तिगत उभारणीसाठी वापरायची नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गजानन बाबर: शरद पवार

राजकारण हे राजकारणासाठी असते. त्याचबरोबर सत्तेसाठीही असते. मात्र, मिळालेली सत्ता व्यक्तिगत उभारणीसाठी वापरायची नसते. ज्या सामान्य माणसाच्या शक्तीने आणि पाठिंब्याने आपण इथपर्यंत आलो,

संग्रहित छायाचित्र

बाबर यांनी केला विकासाचा विचार

राजकारण हे राजकारणासाठी असते. त्याचबरोबर सत्तेसाठीही असते. मात्र, मिळालेली सत्ता व्यक्तिगत उभारणीसाठी वापरायची नसते. ज्या सामान्य माणसाच्या शक्तीने आणि पाठिंब्याने आपण इथपर्यंत आलो, याची नोंद घेऊन अखंडीतपणे विकासाचा विचार करणे महत्त्वाचे असते आणि हेच कार्य अनेक वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि मावळचे प्रथम खासदार गजानन बाबर (Gajanan Babar) यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवले. मात्र, आज परिस्थिती बदललेली आहे, असे मत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार स्वर्गीय गजानन बाबर यांच्या 'संघर्षयात्री' पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शदर पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, राहुल कलाटे आदी या वेळी उपस्थित होते.  कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक तानाजी गोरे यांचा सन्मान करण्यात आला. (Maval Loksabha Constituency)

पवार म्हणाले, महाराष्ट्रात अनेक नेते होऊन गेले. त्यांनी नेहमीच विधायक कामांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातील एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे होय. यशवंतराव चव्हाणांनी राज्याला योग्य दिशा दिली. पिंपरी-चिंचवड शहरात शेती एके शेती व्हायला नको. शहर औद्योगिक नगरी बनायला हवी, अशी त्यांची दूरदृष्टी होती. त्यानुसार त्यांनी धोरण आखले, तर बाळासाहेबांनी अनेक माणसे तयार केली. त्यांच्यामुळे हजारो कर्तृत्ववान तरुण पुढे आले. सामान्य कुटुंबातील मुले तयार करण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यातीलच एक म्हणजे स्वर्गीय गजानन बाबर होय. गजानन बाबर यांचा प्रवास संघर्षाचा होता. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचे संघर्षयात्री हे नाव अतिशय यथोचित आहे. त्यांनी प्रतिकुल परस्थितीमध्ये कर्तृत्व दाखविले. माणसे जोडली, संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी मदत केली. त्यामुळेच या भागातील जनतेने त्यांना मनापासून स्वीकारले.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, इतिहास सांगितला जातो लढणारांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. दिल्लीत मांडलिक झालेल्यांचा इतिहास सांगितला जात नाही. केवळ मिळणारा निधी म्हणजे विकास नसतो. उभ्या राहणाऱ्या इमारती म्हणजे विकास नसतो, तर स्वाभिमानी महाराष्ट्र हाही एक विकास आहे. आज महाराष्ट्राला संघर्षाची पार्श्वभूमी लाभली आहे. या परिस्थितीत एका माणसाने गुडघे टेकले तर महाराष्ट्र झुकला, असे जेव्हा दिल्लीला वाटते. तेव्हा तो माणूस लढायला उभा राहतो. संजोग वाघेरे आणि विलास लांडे यांनी आपल्या मनोगतात बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. लांडे यांनी बाबर यांच्या आठवणींना उजाळा देताना संजय राऊत यांच्या संघर्षाला सलाम केला. सकाळी उठलो की राऊत साहेब नडत असतात. आत जाऊन आले तरी ते घाबरत नाहीत आणि काही लोक आत जायलाच घबारतात, असा टोमणा त्यांनी मारला.

तुतारी आणि मशाल याच या महाराष्ट्राच्या दिशादर्शक : संजय राऊत

माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या भाषणात पुरंदरच्या तहाचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना राजकीय चिमटा काढला. याचा धागा पकडत,  खासदार संजय राऊत म्हणाले, अनेकदा असे म्हणतात महाराष्ट्र युद्धात जिंकतो आणि तहात हारतो. मात्र, आपण तहातही हरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात बादशहाला किल्ले दिले. मात्र, बादशहा इथेच गाडला गेला. आम्हीही ४० - ४० दिलेत. सध्या कॉंग्रेसने एकच दिलाय. मात्र, आता आपण १८१ किल्ले जिंकू. शिरूर, बारामती, मावळसह अख्खा महाराष्ट्र जिंकू. तुतारी, मशाल या निशाणी म्हणजे शुभयोग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याला छत्रपतींच्या पॅलेसमध्ये गेले होते. तेथे त्यांचे स्वागत पन्नास तुताऱ्यांनी केले. तुतारी ऐकून ते गांगरले. तुतारी आणि मशाल हीच या महाराष्ट्राची दिशादर्शक आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे, माघार घ्यायची नाही. हा महाराष्ट्र पळपुट्यांचा नाही, नामर्दांचा नाही, गद्दारांचा नाही. महाराष्ट्राला लढल्याशिवाय काहीच मिळाले नाही. मराठी माणसाला नेहमीच संघर्ष करावा लागला. हा महाराष्ट्र, मराठी अस्मिता, लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी संघर्षासाठी तयार राहायला हवे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest