राष्ट्रवादीची पुण्यात महाबैठक
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची महाबैठक पुण्यात पार पडली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे, आमदार राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासोबत जिल्ह्यासंदर्भातील बैठक आज पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसने अनेक मतदा संघात जाऊन आढावा घेतला आहे. महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाने कसा आढावा घ्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांनी भाष्य केलेले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत गेले पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुणे आणि नाशिकबाबत देखील विचार सुरू असल्याचे भाष्य त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांची सातत्याने दिल्लीवारी होत आहे, याबद्दल अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, गोवा, गुवाहाटी, सुरत आणि दिल्लीवारी कोणाला कोणती वारी करायची असेल तर त्यांना ते करूदे, आम्हाला आता तुकोबा-माऊलींची वारी करायची आहे. ती वारी आमच्या दृष्टीने महत्त्वाची वारी आहे. आम्ही साधू-संतांचा विचार पुढे घेऊन जाणारी माणसे आहोत, असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.