संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी झाली. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून, उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी ७ मे, तर तिसरी तपासणी ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल, अशी माहिती पुणे जिल्हा निवडणूक खर्च देखरेख पथक प्रमुख पद्मश्री तळदेकर यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा. तसेच निवडणूक कामकाजाकरिता उमेदवाराने दररोज केलेल्या खर्चाचा तपशील, बँक पासबुक व सर्व देयकांच्या मूळ पावत्यांसह खर्च सादर करावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिका-यांनी उमेदवारांना दिलेल्या आहेत.
दरम्यान, उमेदवाराचा खर्च तपासणीच्या दिवशी उमेदवार अथवा त्यांचा अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे. तपासणीवेळी दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत नोंदवून तपासणीसाठी सादर करावी. अनुषंगिक कागदपत्रे सोबत आणावीत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या. तपासणीच्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास अथवा खर्चामध्ये तफावत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही तळदेकर यांनी सांगितले.
प्रचार वाहनांवर वॉच
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हीडीओ सनियंत्रण पथक, व्हीडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. त्याचप्रमाणे इतर पथकांकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते.
९५ लाखांपर्यंत करा खर्च
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये इतकी आहे. मतदारसंघामध्ये एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यांच्या दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हीडीओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचार खर्च नोंदला जातो.