पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको
पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. भाजपचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे यांच्या दिवाळी किराणा वाटप कार्यक्रमात, काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात हे आंदोलन केले.
भाजपचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे यांच्या किराणा वाटप कार्यक्रमात प्रकाश गायकवाड यांनी भाषण करताना अनंतराव थोपटे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होतं पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.
या आंदोलनाच्या वेळी प्रतिमेला जोडे मारत, जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत पुणे सातारा महामार्ग अडवून धरला होता. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्याचं यावेळी बघायला मिळालं.
दिवाळी किराणा वाटप कार्यक्रमात भाषण करताना प्रकाश गायकवाड यांनी अनंतराव थोपटे यांच्यावर टीका केली. तसेच गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी गायकवाड यांच्यासह 4 जणांवर भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
माजी मंत्री अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आहेत. भोर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा भोरचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.