‘भाजपा ३७० जागा जिंकू शकणार नाही’

प्रशांत किशोर म्हणतात, काँग्रेसच्या संख्येत बदल होण्याची शक्यता कमी, मोदी अजिंक्य असल्याच्या भ्रमात राहू नये

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 26 Feb 2024
  • 10:43 am
 'BJPwillnotbeabletowin370seats'

‘भाजपा ३७० जागा जिंकू शकणार नाही’

नवी दिल्ली : मार्चच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची तयारी जोराने सुरू आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्षांसह देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातच निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत एक धाडसी विधान केले आहे. प्रशांत किशोर म्हणतात की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागादेखील जिंकू शकणार नाही. मला काँग्रेसच्या जागांमध्ये फारसा बदल होईल असे दिसत नाही. (२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या). भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ या घोषणेलाही फारसा अर्थ नसल्याचे मत व्यक्त करत प्रशांत किशोर म्हणाले, भाजपा ३७० जागादेखील जिंकू शकणार नाही. तसेच मोदींना कोणीच पराभूत करू शकत नाही, असल्या भ्रमात कोणीही राहू नये, असेही ते म्हणाले. 

एका मुलाखतीवेळी प्रशांत किशोर म्हणाले की, जो नेता पाच वर्षे जमिनीवर राहून (ग्राऊंड लेव्हलवर) काम करणारा असेल, मेहनत करणारा असेल, तो आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल. मोदींना कोणीच पराभूत करू शकत नाही, असल्या भ्रमात कोणीही राहू नये. त्याचबरोबर माध्यमांनीही असल्या अफवा पसरवू नये. मोदींना पराभूत करणं शक्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये मोदींनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये लहान-मोठे पराभव पाहिले आहेत.

प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये ‘जनसुराज यात्रा’ काढली आहे. त्याच्या माध्यमातून ते बिहारमधील जनतेचं निवडणूक आणि मतदानाबाबत प्रबोधन करत आहेत. प्रशांत किशोर लवकरच बिहारच्या राजकारणात उतरतील असं बोललं जात आहे.

१९७७ च्या निवडणुकीचं उदाहरण

प्रशांत किशोर म्हणाले, इंदिरा गांधी सत्तेत होत्या तेव्हा आणि राजीव गांधी यांनी प्रचंड बहुमताच सरकार बनवलं होते, तेव्हादेखील काही लोकांना असं वाटत होतं की यांना आता कोणीच पराभूत करू शकत नाही. परंतु, देशातल्या जनतेने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनादेखील पराभवाची चव चाखायला लावली होती. १९७७ मध्ये जनता पार्टीने इंदिरा गांधींसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. तसेच त्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधींनी सत्ता गमावली होती.

काँग्रेसच्या वाटचालीबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, ५०-५५ जागा जिंकून तुम्ही या देशाचं राजकारण आणि सत्ताकारण बदलू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेससाठी काही सकारात्मक गोष्टी घडतील असे मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये काही सकारात्मक बदल होताना मला दिसत नाहीत. मोठा बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेसला किमान १०० जागा तरी जिंकाव्या लागतील. काँग्रेस १०० च्या आसपास पोहोचण्याची शक्यतादेखील कमीच आहे. सध्याच्या घडीला तरी ते शक्य नाही.

भाजपा ३७० जागा जिंकेल?

भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. याबाबत प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाने हे लक्ष्य केवळ कार्यकर्त्यांसाठी ठेवलं आहे. त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून अधिकाधिक मेहनत करून घेण्यासाठी, त्यांच्यातलं चैतन्य कायम राखण्यासाठी भाजपाने हे लक्ष्य ठेवलं आहे. परंतु, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये. प्रत्येक नेत्याला आणि पक्षाला आपल्यासमोर एक मोठं आव्हान ठेवण्याचा अधिकार आहे. 

त्याने ते आव्हान पूर्ण केले तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही तर त्या पक्षाने इतकं नम्र असावं की, त्यांनी त्यांच्या चुका स्वीकारायला हव्यात.  प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, भारतीय जनता पार्टी यावेळी पश्चिम बंगालमध्ये उत्तम कामगिरी करेल. पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या संदेशखाली प्रकरणाचा सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest