शरद पवारांना संपवणे हेच भाजपचे एकमेव उद्दिष्ट: सुळे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना संपविण्याच्या एकमेव उद्देशाने भारतीय जनता पक्ष काम करत आहे. त्यासाठीच ते मैदानात उतरले आहेत. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचे नाही.

Supriya Sule

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना संपविण्याच्या एकमेव उद्देशाने भारतीय जनता पक्ष काम करत आहे. त्यासाठीच ते मैदानात उतरले आहेत. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचे नाही. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी काही करायचे नाही. भाजपला केवळ सुडाचे राजकारण करायचे आहे. जो कोणी नेता महाराष्ट्राची आन-बाण आणि शान म्हणून दिल्लीत वावरतो. त्यांना संपवायचे धोरण भाजपचे आहे. ही कबुलीच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) प्रचार करण्यासाठी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वारजे, सनसिटी, हिंगणे, वडगाव भागातील स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला.

सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) विरोधात लढण्यास तयार आहात काय, या प्रश्नाचे थेट उत्तर टाळून त्या म्हणाल्या की, गेल्या १५ वर्षांपासून लोकसभेची सदस्य म्हणून मी काम करत आहे. माझ्या कामगिरीच्या आधारावर मी महाविकास आघाडीकडे तिकिटाची मागणी केली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीने तिकीट दिले आहे. सामाजिक जीवनात वावरताना राजकारण वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे, या पद्धतीने नेहमी काम केले आहे. आमच्या कुटुंबावर नेहमी हेच संस्कार राहिले आहेत. आमच्यामध्ये तेवढी वैचारिक प्रगल्भता आहे. तसेच देशात मोठी दडपशाही सुरू आहे. जे विरोधात जात आहे, त्यांना अटक केली जात आहे.

न्यायपालिकेत वाढलेल्या हस्तक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली आहे, याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. तसेच त्यांना धमक्या  दिल्या जात आहेत. जर विरोधी पक्षांसदर्भात एकाद्या उद्योगपतींनी काही वक्तव्य केले तर त्यांना अडचणीत आणले जात आहे. ईडी-सीबीआएने तब्बल ९५ टक्के विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई केली. याच लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर या केसेसचे काय होते, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. सातारा आणि माढा लोकसभा जागेसंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

उदयनराजे यांचा अपमान...

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गादीचा देशभरात सन्मान केला जातो. मात्र, छत्रपतींच्या गादीचा वारस असलेल्या उदयनराजे यांना गेल्या १५ दिवसांपासून ताटकळत ठेवले आहे. त्यांना मतांसाठी केवळ छत्रपतींचा आशीर्वाद हवा असतो, परंतु, उदयनराजे यांचे अद्याप तिकीट जाहीर केले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा आणि उदयनराजे यांचा भाजपने केलेला अपमान आहे. केंद्रातील भाजपा सरकार मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात सुडाचे राजकारण करत असल्याचा हा पुरावा आहे, असेही त्या म्हणाल्या. शरद पवारांनी आणि संघटनेने उदयनराजे यांना खूप प्रेम दिले असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest