SushilKumar Shinde : शिंदे पिता-कन्येला भाजपची ऑफर!

माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतील काॅंग्रेसचे ताकदवान नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काॅंग्रेसला रामराम ठोकल्याची घटना ताजी असतानाच ‘मला आणि मुलगी प्रणितीला (Praniti Shinde) भाजपकडून ऑफर आली आहे,’

SushilKumar Shinde

शिंदे पिता-कन्येला भाजपची ऑफर!

लोकसभेत दोन वेळा पराभव होऊनही मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर आल्याचा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा दावा

माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतील काॅंग्रेसचे ताकदवान नेते मिलिंद देवरा (Milind Deora)  यांनी काॅंग्रेसला रामराम ठोकल्याची घटना ताजी असतानाच ‘मला आणि मुलगी प्रणितीला (Praniti Shinde)  भाजपकडून ऑफर आली आहे,’ असा दावा ज्येष्ठ काॅंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी बुधवारी (दि. १७) केल्यामुळे काॅंग्रेसच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

राज्याचे मुख्यमंत्री, केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमात  हे विधान केल्यानंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चेला तोंड फुटले आहे. ‘‘माझा आणि प्रणिती शिंदेंचा दोन वेळा पराभव करूनही आता आम्हाला भाजपकडून ऑफर आली आहे,’’ अशी माहिती यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. नुकतंच काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदेंनीही आपल्याला भाजपची ऑफर आल्याचे उघड केलं आहे. मागील आठवड्यातच ‘‘कोणी कल्पनाही करणार नाही, असे राज्यातील नेते येत्या काळात भाजपमध्ये येणार आहेत,’’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन या दोघांनीही केला होता. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस फोडल्यानंतर आता भाजपने काॅंग्रेसवर लक्ष केंद्रित केले असून येत्या काळात काॅंग्रेसमधील अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये येतील, असे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या घटकांकडून सांगण्यात आले होते. मागील वर्षी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक असलेले काही आमदार तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण तसेच अमित देशमुख या दोघांनीही वेळोवेळी त्याचा इन्कार केला.

इतर पक्षातील चांगले नेते भाजपला हवेच आहेत : दरेकर

मुंबईतील भाजपचे वजनदार नेते प्रवीण दरेकर यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या दाव्याला बळकटी देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर आहे. काही इतर पक्षातील चांगले नेते आपल्याकडे यावे, ही भाजपची भूमिका राहिली आहे. यावर पक्षाचे काम सुरू आहे. देशाच्या विकासासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी मोदींचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. मिलिंद देवरांचा पक्षप्रवेश हादेखील त्याचेच एक उदाहरण आहे. अशा अनेक घटना पुढे घडतच राहणार आहेत. आजच्या तरुणाईमध्ये मोदींचं आगळंवेगळं आकर्षण आहे. मोदींमुळे तरुण पिढी भारावली आहे.  मोदींच्या नेतृत्वात देशाने विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. मोदींनी गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं. जात, पक्ष आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मोदींनी देशाला प्रगतिपथावर नेले आहे.’’

चंद्रकांत पाटील घेणार सुशीलकुमार शिंदेंची भेट

सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील त्यांची भेट घेणार आहेत. याकडे राजकीय भेट म्हणून पाहिले जात आहे. मात्र याबाबत विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मी केवळ नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहे.’’ चंद्रकांत पाटील हे शिंदेंच्या सोलापुरातील राहत्या घरी त्यांची भेट घेणार आहेत. आता या भेटीमुळे शिंदे पिता-कन्येच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्याने अधिक जोर धरला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest