संग्रहित छायाचित्र
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर विराजमान झाले आहेत. आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. एनडीएचे सरकार सत्तेवर आले असले तरी तूर्त राज्यातील महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही. त्यांचा लोकसभेत एक आणि राज्यसभेत एक असे दोन खासदार आहेत. त्यातच अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी विधानसभेला आपल्या पक्षाला किती जागा मिळायला हव्या, यावर भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभेला ८० जागा लढवल्या पाहिजेत”, असे अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
अनिल पाटील म्हणाले, महायुतीमध्ये आम्ही कर्तव्य म्हणून पक्षाच्या वतीने सर्व जबाबदारी पार पाडली आहे. जळगावमध्ये कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांमागे खंबीरपणे ताकद लावली. त्यामुळे भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला फक्त ४ जागा मिळाल्या. एक जागा महादेव जानकर यांना देण्यात आली. या निवडणुकीत आमची फक्त एक जागा निवडून आली. मात्र, एनडीए निर्माण केली त्याच्या नियमानुसार एका पक्षाला वेगळा न्याय कसा देणार, असं त्यांना वाटलं असेल. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी आमच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं आहे. येणाऱ्या काळात काही वेगळं मिळत असेल तेव्हा नक्की अजित पवार गटाचा विचार होईल.
विधानसभेला पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर ते म्हणाले, महायुतीमध्ये एक निकष ठरलेला आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ९० जागांची मागणी केलेली आहे. माझ्या मते ८० जागा अजित पवार गटाने लढवल्या पाहिजेत. शक्य असेल तेथे सर्व्हे करून उमेदवारांची घोषणा केली पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ८० जागांची मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील. जळगाव जिल्ह्यात ४ जागांची मागणी आम्ही करणार आहोत. त्याबरोबरच धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात ८ जागांची मागणी करणार आहोत.