निवडणुकीनंतरच्या मंत्रिमंडळात आपण नक्कीच असणार- आठवले

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे संविधान बदलणे शक्य नाही’

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 11 Mar 2024
  • 02:56 pm
'PrimeMinisterNarendraModi

निवडणुकीनंतरच्या मंत्रिमंडळात आपण नक्कीच असणार- आठवले

#मुंबई

लोकसभा निवडणुकीची घोषणाही झालेली नसताना आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार याची शाश्वती नसतानाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढील मंत्रिमंडळातही आपण मंत्री असणार याची खात्री व्यक्त केली आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी आगामी राजकीय चित्र काय असेल यावर आपले मत व्यक्त केले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाचे आणि प्रतिस्पर्धी पक्षाच्या पराभवाचे दावे सगळेच करताना पाहायला मिळत आहेत. सध्या जागावाटपासाठी महाविकास आघाडी आणि युतीमध्ये चर्चा-बैठका होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर २०२४ च्या निवडणुकीनंतर काय होणार, यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दावा केला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निवडणुकीमध्ये आपला पक्ष सत्तारूढ एनडीएमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी आपल्या मंत्रिपदाचीही घोषणा केली आहे. निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या मंत्रिमंडळात आपण नक्कीच असणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. 

यावेळी रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे सरकार देशाचे संविधान बदलणार असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. याबाबत ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाला ‘संविधान सदन’ हे नाव दिलं आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संविधानाबद्दल एवढा आदर बाळगणारे मोदी संविधान बदलणे शक्य नाही. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोत, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी मोदी यांना पाठिंबा दिला आहे.

ते म्हणाले, नरेंद्र मोदी अनेकदा येथे आले. केंद्र सरकारतर्फे हजारो कोटींची मदत मुंबई-महाराष्ट्राला दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. मोदी पंतप्रधान झाले, की मी मंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित झालेले नसताना रामदास आठवलेंनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत विश्वास व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest