भाजप खासदाराने प्रचारादरम्यान महिलेचे घेतले चुंबन; वरून म्हणाले मुलीचे चुंबन घेण्यात गैर काय?
कोलकाता (Kolkata) : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार खगन मुर्मू (Khagan Murmu) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बंगालच्या उत्तर मालदा मतदारसंघाचे खासदार मुर्मू हे प्रचारासाठी फिरत असताना त्यांनी एका महिलेचे चुंबन घेतले. या घटनेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. सदर घटना सोमवारी (८ एप्रिल) घडली. भाजपचे खासदार मतदारसंघातील चंचल येथील श्रीहीपूर गावात प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी एका महिलेला जवळ ओढून तिचे चुंबन घेतले. त्यानंतर सोशल मीडियावर सदर फोटो व्हायरल झाला. (Khagan Murmu kiss)
तृणमूल काँग्रेसने हा फोटो एक्स अकाऊंटवर शेअर करून भाजपावर टीका केली. भाजपमध्ये महिलाविरोधी राजकारण्यांची कमतरता नाही, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. तुम्ही जे फोटोमध्ये पाहत आहात, त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर यामागचा प्रसंग आम्ही सांगतो. या फोटोत दिसणारे भाजपाचे खासदार खगन मुर्मू असून ते उत्तर मालदाचे उमेदवार आहेत. प्रचारात फिरत असताना त्यांनी स्वतःहून एका महिलेचे चुंबन घेतले. भाजपच्या एका खासदाराने महिला कुस्तीपटूंचा अवमान केला. भाजपाचे नेते बंगाली महिलांवर आक्षेपार्ह गाणी तयार करतात. भाजपामधील नेते महिलांना सन्मान देत नाहीत. यापद्धतीने मोदी यांचा परिवार महिलांना सन्मान देतो. जर भाजप सत्तेत आले तर काय करतील? अशी टीका तृणमूल काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवर केली आहे. मालदा जिल्ह्याचे तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष दुलाल सरकार यांनीही या घटनेचा निषेध केला. खासदारांचे कृत्य बंगाली संस्कृतीच्या विरोधात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. लोकांनीच भाजपला मत देताना विचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
मुलीचे चुंबन घेण्यात गैर काय?
दरम्यान खासदार खगन मुर्मू यांनी मात्र त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. सदर महिला माझ्या मुलीप्रमाणे आहे, असे त्यांनी म्हटले. आपल्या मुलीचे चुंबन घेण्यात काहीही वावगे नाही. माझ्या कृतीवर टीका करून टीएमसी त्यांचे संस्कार दाखवत आहे, असे प्रत्युत्तर मुर्मू यांनी दिले.