संग्रहित छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ मे रोजी वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाराणसी येथे १ जून रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या अर्जासोबत आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी त्यांचे शिक्षण, वय आणि व्यवसाय यांचीही माहिती या अर्जासोबत दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण स्थावर आणि जंगम मिळून ३ कोटी २ लाख रुपयांची मालमत्ता आहे. पंतप्रधान मोदी यांचे भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात २ कोटी ८९ लाख ४५ हजार ५९८ रूपये आहे. तसेच ५२ हजार ९२० रूपये इतकी रोख रक्कम असल्याचेही मोदी यांनी नमूद केले आहे. मोदी यांची गांधीनगर आणि वाराणसी येथे दोन बँक खाती आहेत. त्यात ८० हजार ३०४ रूपये आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याकडे ४५ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची एकूण किंमत २ लाख ६७ हजार रूपये इतकी आहे. तसेच मोदी यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून ९ लाख १२ हजार रूपये गुंतवले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. मोदी यांनी १९६७ मध्ये एसएससीची परीक्षा दिलेली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून १९७८ मध्ये बीएची पदवी घेतली. तर १९८३ मध्ये गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतली.
पंतप्रधान मोदी हे अहमदाबादचे रहिवासी असून राजकारण हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणात त्यांना दोषी ठरवले गेलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान मोदी यांनी पत्नी महणून जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच जशोदाबेन यांच्याकडे किती संपत्ती आहे यासंदर्भातील माहिती देताना मोदी यांनी 'माहिती नाही' असे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर कोणतंही घर किंवा कार नाही.