भाजपनेच केला मद्यघोटाळा
नवी दिल्ली : आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजयसिंह यांनी तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच केंद्रातील सत्ताधारी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. भाजपनेच मद्यघोटाळा (liquor scam) केल्याचा पलटवर त्यांनी केला आहे.
संजयसिंह यांनी शुक्रवारी (दि. ५) पत्रकार परिषद घेऊन मद्यघोटाळ्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक षडयंत्र रचून अटक करण्यात आली आहे. भाजपनेच हा घोटाळा केला आणि कट रचून मुख्यमंत्र्यांसह आपच्या नेत्यांना यात अडकवले. ईडीने टीडीपी खासदार मंगुटा रेड्डी आणि त्यांचे वडील राघव रेड्डी यांच्यावर केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्य करण्यासाठी दबाव आणला आहे. मंगुटा रेड्डी आता पंतप्रधानांचा फोटो लावून निवडणूक लढवत आहेत. तेलगू देसम पक्ष हा एनडीएचा मित्रपक्ष आहे.’’
सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर बुधवारी (दि. ३) संध्याकाळी संजय सिंह यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. ते सहा महिने तुरुंगात होते. पत्रकार परिषदेत मद्यघोटाळा आणि त्या निमित्ताने रचण्यात आलेल्या कटाची माहिती देताना संजयसिंह म्हणाले, ‘‘मंगुटा रेड्डी यांनी तीन, तर त्यांचा मुलगा राघव मंगुटा यांनी सात वेळा जबाब दिला आहे. १६ सप्टेंबर २०२२ रोजी जेव्हा मंगुटा रेड्डी यांना ईडीने प्रथमच विचारले की ‘ते अरविंद केजरीवाल यांना ओळखतात का?’ तेव्हा त्यांनी सत्य सांगितले की ते अरविंद केजरीवाल यांना भेटले होते, परंतु चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या बाबतीत. त्यानंतर त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आणि पाच महिने तुरुंगात ठेवल्यानंतर वडिलांनी त्यांचे म्हणणे बदलले.’’
२०२३ मध्ये १० फेब्रुवारी ते १६ जुलै या काळात राघव मंगुटाचे सात जबाब घेण्यात आले. यातील सहा जबाबांमध्ये ते केजरीवाल विरोधात काहीही बोलले नाही, परंतु १६ जुलै रोजी दिलेल्या सातव्या जबाबात त्यांनी आपली भूमिका बदलली आणि षडयंत्राचा एक भाग बनले.
पाच महिन्यांच्या छळानंतर त्यांनी आपले विधान बदलले आणि अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे राहिले. ईडी आणि न्यायालयाने त्यांच्या आधीच्या सहा जबाबांचा विचार न करता केवळ सातव्याच जबाबांचा विचार का केला, हे अनाकलनीय आहे, असा आरोप संजयसिंह यांनी यावेळी केला. अटक होण्यापूर्वीही आपचे खासदार संजयसिंह यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन ईडीवर गंभीर आरोप केले होते.
तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात सिसोदिया म्हणतात, लवकरच बाहेर भेटू
दिल्ली मद्यधोरणप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून आपल्या विधानसभा मतदारसंघातील लोकांना पत्र लिहिले आहे. यात ते म्हणतात, ‘‘आपण लवकरच बाहेर भेटू. शिक्षा क्रांती झिंदाबाद, लव्ह यू ऑल.’’
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत शैक्षणिक क्रांती झाली याचा मला आनंद आहे. मी गेल्या एक वर्षापासून येथे आहे. या काळात मला सगळ्यांची आठवण झाली. आम्ही सर्वांनी दिल्लीतील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या हुकूमशाहीविरुद्ध जशी प्रदीर्घ लढाई झाली, त्याचप्रमाणे आता आम्ही चांगल्या शिक्षणासाठी आणि शाळांसाठी लढत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांना त्यांच्या सरकारचा खूप अभिमान होता. इंग्रज राज्यकर्तेही खोटे आरोप करून लोकांना तुरुंगात टाकायचे. त्यांनी गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांना अनेक वर्षे तुरुंगात ठेवले. ते दोघेही माझे प्रेरणास्थान आहेत. दिल्लीची जनता ही माझी ताकद आहे. देशाचा विकास करायचा असेल तर चांगले शिक्षण आणि शाळा असणे आवश्यक आहे. पंजाबमधील शैक्षणिक क्रांतीची बातमी वाचून मला आनंद वाटतो. तुरुंगात गेल्यापासून माझे तुमच्यावरील प्रेम आणखीनच वाढले आहे.’’वृत्तसंंस्था
मद्यधोरण घोटाळा : टाइमलाईन
१७ नोव्हेंबर २०२१
नवीन मद्यधोरण लागू
८ जुलै २०२२
मद्यधोरणात घोटाळा झाल्याचा आरोप
२८ जुलै २०२२
दिल्ली सरकारने नवीन धोरण रद्द
१७, २२ ऑगस्ट २०२२
सीबीआय आणि ईडीने नोंदवला गुन्हा
२६ फेब्रुवारी २०२३
सीबीआयकडून उपमुख्यमंत्री
मनीष सिसोदिया यांना अटक
४ ऑक्टोबर २०२३
ईडीकडून खासदार संजय सिंह यांना अटक
२१ मार्च २०२४
ईडीने केली मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांना अटक