अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये झॉम्बी ड्रगचा कहर!; तब्बल अकरा जणांचा मृत्यू
लंडन : कोरोना विषाणूने जगाला हादरवले होतं. त्यानंतर आता एक घातक झॉम्बी ड्रग (Zombie drug) जगभरात लोकांचे बळी घेत आहे. अमेरिका, युरोपनंतर आता ब्रिटनमध्येही झॉम्बी आजाराने अनेकांचा जीव गेला आहे. ब्रिटनमध्ये झॉम्बी ड्रगने ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
आता या लोकांच्या मृत्यूचा संबंध थेट अमेरिकेशी जोडला जात आहे. या झॉम्बी ड्रगमुळे हात, पायांना जखमा होतात. या गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यूदेखील होतो. या ड्रगचा जास्तीत जास्त प्रभाव त्वचेवर होतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागात जखमा दिसू लागतात. रुग्ण झॉम्बीसारखा फिरतो म्हणूनच याला झॉम्बी ड्रग असेही म्हणतात.
झायलेझाईन असे या ड्रगचं नाव आहे. याला ट्रान्क नावानेही ओळखलं जातं. याचा वापर खरंतर पिसाळलेले घोडे किंवा गाईंना शांत करण्यासाठी केला जातो. मात्र, काळ्या बाजारात याची विक्री अमली पदार्थाच्या रूपात केली जाते. हेरॉईन किंवा फेंटानील अशा अमली पदार्थांमध्ये मिक्स करून हे औषध विकले जाते.
माध्यमातील वृत्तानुसार विक्रेते झॉम्बी ड्रग्स कोकेन, हेरॉइनसारख्या मादक पदार्थांमध्ये मिसळतात. त्यामुळे त्यांचे औषध घेण्याचे प्रमाण वाढते. त्याचा शरीरावर जास्त परिणाम होतो आणि खर्चही कमी होतो. त्यामुळेच त्याचा वापर वाढत आहे. अमली पदार्थ विक्रेते त्याचा बिनदिक्कत वापर करत आहेत. अमेरिकेतील अरोग्यविषयक संस्था सीडीसीचे म्हणणे आहे की, जेव्हा हे औषध अमली पदार्थात मिसळून घेतले जाते तेव्हा ते अधिक धोकादायक बनते. हे औषध घेतल्यानंतर व्यक्ती शुद्धीत राहात नाही. शरीरावर जखमा दिसतात. हळूहळू ही स्थिती जीवघेणी बनते.
हे ड्रग घेतल्यानंतर लोकांमध्ये झॉम्बीची लक्षणे दिसून येतात. गेल्या वर्षी अमेरिकेतील काही लोकांचे विचित्र वागतानाचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या लोकांची त्वचा सोलली जात होती, तसेच त्यांना चालतानाही अडचण येत होती. एखाद्या हॉलिवूडपटातील झॉम्बी ज्याप्रमाणे असतात, अगदी तसेच हे लोक दिसत असल्यामुळे ड्रगला झॉम्बी ड्रग असं नाव पडले. हे ड्रग शरीरात पोहोचल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी त्याचा परिणाम दिसू लागतो. ड्रग घेणाऱ्याचे भान हरपते. तो अनेक तास नशेत राहतो. या काळात ती व्यक्ती दीर्घकाळ त्याच स्थितीत बेशुद्ध राहिल्यास शरीरातील दाब वाढून प्रकृती बिघडते. या ड्रगच्या सेवनाने जखमांचा धोकाही वाढतो. या ड्रगवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, ड्रगचा प्रभाव जितका जास्त, तितका धोका जास्त असतो. ड्रग घेऊन बेशुद्ध पडलेल्या माणसाचा कधीही मृत्यू होऊ शकतो. या ड्रगमुळे रुग्णाला नैराश्य येते. काही प्रकरणांमध्ये, रुग्ण इतके गोंधळून जातात की त्यांना सतत उलट्या होतात.
हे ड्रग शरीरात गेल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब कमी होणे, हृदयाचे ठोके कमी होणे, शरीरावरील जखमा अधिक वाढणे आदी लक्षणे दिसू लागतात. अशी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. औषधांच्या ओव्हरडोसच्या प्रकरणांमध्ये रुग्णांना नॅलोक्सोन नावाचे औषध दिले जाते. हे नशेचे परिणाम कमी करण्याचे काम करते. त्यामुळे रुग्णांनी थेट हॉस्पिटलशी संपर्क करावा, असे आवाहन अमेरिकन हेल्थ डिपार्टमेंटे केले आहे.