संग्रहित छायाचित्र
अहमदनगर/ मुंबई
केजरीवाल यांच्यासारखा माणूस एकेकाळी माझ्यासोबत काम करायचा, तेव्हा आम्ही दारूविरोधात आवाज उठवायचो. आता मात्र ते दारू धोरण बनवत आहेत. मला याचे खूपच दुःख झालं आहे. परंतु करणार काय? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, या शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून झालेल्या अटकेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शरद पवार यांनी केजरीवाल यांना पठिंबा देताना अटकेचा निषेध केला आहे.
अण्णा हजारे पूर्वी केजरीवाल यांचे गुरू होते. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनात केजरीवाल सर्वात पुढे होते. परंतु, आंदोलन चालू असतानाच केजरीवाल यांनी राजकारणात यायचं ठरवलं, त्यामुळे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात बिनसलं. त्यानंतर या दोघांचे मार्ग बदलले. पुढे केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष काढला. आता हा पक्ष दिल्ली, पंजाबमध्ये सत्तेत आहे. अण्णा म्हणाले, दारू धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाली, हे त्यांच्या कृतीमुळे झालं आहे. त्यांनी मद्य धोरण बनवले नसते तर अटकेचा प्रश्न आला नसता. आता जे होईल ते कायद्यानुसार होईल. दिल्लीतील दारू घोटाळाप्रकरणी तब्बल १० समन्स बजावल्यानंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली.
कुमार विश्वास काय म्हणाले?
कधीकाळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षात असणारे, त्यांचे कट्टर समर्थकच नव्हे, तर जिवाभावाचे मित्र असणारे कुमार विश्वास (Kumar Vishwas) मतभेद झाल्यामुळे पक्षातून बाहेर पडले. पेशानं कवी असणारे कुमार विश्वास यांचा स्वभावही कवीचाच आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर कुमार विश्वास पोस्टमध्ये म्हणतात, ‘कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करहि सो तस फल चाखा’. हे विश्व कर्मप्रधान असून जी व्यक्ती जसे कर्म करते, त्या व्यक्तीला तसेच फळ मिळतं असा साधारण याचा अर्थ होतो. या ओळींसह कुमार विश्वास यांनी त्यांचा नतमस्तक झालेला एक फोटोही पोस्ट केला आहे.