हातात संविधानाची प्रत घेवून प्रियांका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ
केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन त्यांनी शपथ घेतली. या वेळी संसदेत त्यांच्यासोबत आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी उपस्थित होते. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींना 6.22 लाख मते मिळवत विजय प्राप्त केला.
प्रियांका यांच्या सोबतच काँग्रेसचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही आज खासदारकीची शपथ घेतली. चव्हाण यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून मराठीमधून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांनी देखील हातामध्ये संविधानाची प्रत घेतली होती. रवींद्र चव्हाण यांनी पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला.
शपथविधीनंतर लगेचच संसदेच्या दोन्ही सभागृहांत घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे सभागृहाची कार्यवाही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाची सुरुवात 25 नोव्हेंबर रोजी झाली, मात्र सुरुवातीच्या काही दिवसांत गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.