संग्रहित छायाचित्र
बरेली : प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करणे सामान्य बाब झाली आहे. गुगल मॅप रस्ता शोधण्याचा सोपा पर्याय आहेत. मात्र गुगल मॅपचा वापर करून रस्ता शोधणे तिघांच्या जिवावर बेतले आहेत. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर जात अर्धवट पुलावरून कार कोसळल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरिदपूर, बरेली येथील खालपूर भागात ही घटना घडली आहे. दुर्घटनाग्रस्त कार गुगल मॅपद्वारे दाखवलेल्या मार्गावर धावत होती. मात्र कार अचानक पुलावरून खाली पडल्याने दोन भावांसह तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. अपघात झाला त्यावेळी कार पूर्णपणे जीपीएसवर अवलंबून धावत होती. त्यामुळे पुलाचे काम अपूर्ण असल्याने कार चालकाला कळालेच नाही. निष्काळजीपणामुळे तिघांचा बळी गेला आहे. याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागणार असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सर्वजण गावात एका लग्नाला येत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेळीच बॅरिकेडिंग केले असते तर या लोकांना जीव वाचवता आला असता.
गुगल मॅप वापरताना काळजी घ्यावी
गुगल मॅप हे अतिशय फायदेशीर टूल आहे. मात्र त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे नेहमीच योग्य नसते. गुगल मॅप नेहमीच अपडेट केला जातो, परंतु काही वेळा त्यात चुका होऊ शकतात. यामुळे विशेषतः लहान रस्ते किंवा नव्याने बांधलेल्या भागात समस्या निर्माण होतात. गुगल मॅप नेहमीच अचूक नसते. विशेषत: अचानक जाम किंवा अपघात झाल्यास ते फारसे अचूक नसते. काही वेळा गुगल मॅपमध्ये अपूर्ण पूल किंवा धोकादायक रस्तेही दाखवले जाऊ शकतात. म्हणून, नेहमी सावध राहा आणि आपल्या सभोवतालच्या परिसराची आणि रस्त्यांची काळजी घ्या.