झारखंडमध्ये बहुतांश आमदार कोट्यधीश

झारखंडमध्ये नवनिर्वाचित आमदारांपैकी ८९ टक्के आमदार कोट्यधीश आहेत, तर १४ नव्या आमदारांवर एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची देणी आहेत, असे झारखंड इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) नव्या अहवालात आढळले आहे.

millionaires MLAs in Jharkhand

झारखंडमध्ये बहुतांश आमदार कोट्यधीश

नवनिर्वाचित आमदारांपैकी १४ आमदारांकडून एक कोटी रुपयांचे येणे, एडीआरच्या अहवालातील माहिती

झारखंडमध्ये नवनिर्वाचित आमदारांपैकी ८९ टक्के आमदार कोट्यधीश आहेत, तर १४ नव्या आमदारांवर एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची देणी आहेत, असे झारखंड इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) नव्या अहवालात आढळले आहे. लोहरदगा मतदारसंघातील काँग्रेसचे रामेश्वर उरांव हे सर्वात श्रीमंत असून त्यांनी एकूण संपत्ती ४२.२० कोटी रुपये जाहीर केली आहे. झारखंडमध्ये २०२४ मध्ये विजयी उमेदवाराची सरासरी संपत्ती ६.९० कोटी रुपये आहे, जी २०१९ च्या निवडणुकीत ३.८७ कोटी रुपये होती.

संघटनांनी ८१ विजयी उमेदवारांपैकी ८० उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आणि २०२४ मध्ये नवनिर्वाचित ७१ आमदार कोट्यधीश असल्याचे आढळले. ७१ कोट्यधीश आमदारांपैकी झामुमोचे २८, भाजपचे २०, काँग्रेसचे १४, राजदचे चार, भाकप माले लिबरेशनचे दोन आणि लोजपा (रामविलास), जदयू आणि आजसू पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे. नव्या झारखंड विधानसभेत २०१९ च्या तुलनेत २० टक्के अधिक कोट्यधीश आमदार असतील. अहवालानुसार, २०१९ मध्ये ५६ आमदार कोट्यधीश होते, तर २०१४ च्या विधानसभेत हे प्रमाण ४१ होते. दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार पानकी मतदारसंघातील कुशवाह शशी भूषण मेहता असून त्यांची संपत्ती ३२.१५ कोटी रुपये आहे. गोड्डा मतदारसंघातून राजदचे संजय प्रसाद यादव २९.५९ कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. झारखंड लोकशाही क्रांतिकारी मोर्चाचे (जेएलकेएम) जयराम कुमार महतो यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती सुमारे २.५५ लाख रुपये आहे. नवनिर्वाचित आमदारांपैकी ४२ आमदारांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत सरासरी २ कोटी ७१ लाख रुपयांची वाढ झाली आहे. शैक्षणिक अर्हतेबाबत २८ विजयी उमेदवारांनी आपली पात्रता इयत्ता ८ वी ते १२ वी उत्तीर्ण असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी ५० उमेदवार पदवीधर व त्यावरील आहेत. एक आमदार पदविकाधारक आहे, तर दुसऱ्याने स्वत:ला साक्षर घोषित केले आहे. विधानसभेतील विजयी महिला उमेदवारांची संख्या १० वरून १२ झाली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest