संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : संसदेत जनतेने नाकारलेले मूठभर लोकच वारंवार गोंधळ घालत असतील, कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असतील तर नव्याने सदनात आलेल्या युवा सदस्यांनी आपले विचार कधी मांडायचे, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, विरोधक संसद विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कृतीवर जनतेचे बारीक लक्ष आहे. वेळ आल्यावर त्यांना जनता जबाबदार धरेल. २०२४ चा हा शेवटचा काळ आहे, देशही २०२५ चे स्वागत जोशात आणि उत्साहात करण्याच्या तयारीत आहे. संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थाने विशेष आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या राज्यघटनेचा ७५ व्या वर्षात प्रवेश होणे ही लोकशाहीसाठी अतिशय उज्ज्वल बाब आहे. दुर्दैवाने आपल्या राजकीय फायद्यासाठी काही लोक, ज्यांना जनतेने नाकारले आहे, ते संसदेवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेचे कामकाज थांबवून त्यांचे स्वतःचे उद्दिष्ट साध्य होत नाही, पण त्यांची अशी कृती पाहून जनता त्यांना नाकारते. जनतेने या लोकांना ८०-९० वेळा नाकारले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १६ विधेयक मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनातील चर्चेत जास्तीत जास्त खासदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनात फलदायी आणि रचनात्मक चर्चा होईल, असा आशावाद व्यक्त केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या निवडणुकांना विद्यमान सरकारला अधिक ताकद दिली आहे. आता संसदेत प्रत्येक मुद्यावर सखोल विश्लेषण झाले पाहिजे. जग भारताकडे आशेने पाहात आहे. जगात भारताचे आकर्षण वाढत आहे. त्याला बळ मिळावे, असे उदाहरण आपण ठेवले पाहिजे. संसदेतून तो संदेश गेला पाहिजे, असेही मोदींनी नमूद केले.
१६ विधेयके मार्गी लावण्यावर भर
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. या अधिवेशनात सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयकासह १६ विधेयके सूचीबद्ध केली आहेत. सध्या लोकसभेत आठ आणि राज्यसभेत दोन विधेयके प्रलंबित आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर आक्षेप घेऊ शकतात. अशा स्थितीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
मणिपूर आणि अदानी प्रकरणावरून घेरण्याचा विरोधकांचा डाव
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी, पहिल्याच दिवशी अदानी यांच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. दुसरीकडे सरकारने कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसचे गौरव गोगोई आणि आपचे संजय सिंह यांनी अदानी समूहावरील आरोप आणि भ्रष्टाचारप्रकरणी अमेरिकेत दाखल झालेला खटला अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीनंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मणिपूर हिंसाचार आणि गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत बजावलेला वॉरंट या प्रकरणांवरून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत.