संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवणूकिचा एक दिवस आधी मंगळवारी (दि. १९) भाजपच्या सुधांशू त्रिवेदींनी खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक कथित ध्वनिफीत जारी केली. ज्यामध्ये सुप्रिया सुळे व पटोलेच्या आवाजातील आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भातील संभाषण आहे. सन २०१८ मध्ये बिटकॉइन घोटाळ्यात अटक झालेले माजी पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी एका लेखापरीक्षण कंपनीमध्ये कर्मचारी गौरव मेहता नावाच्या व्यक्तीचा हवाला दिला आहे. आपल्याला अशा १० ध्वनिफिती दिल्याचा दावा केला आहे.
गौरव मेहता यांच्या रायपूरमधील घरावर छापा टाकल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमिवर ईडीने बुधवार (दि. २०) रोजी छत्तीसगडमध्ये कारवाई केली. भाजपने आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) बीटकॉईन घोटाळा प्रकरणी गौरव मेहताला समन्स बजावले आहे. गेन बिटकॉइन फसव्या योजनेचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मेहता याला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयने दिले आहेत.
बुधवारी ईडीने सुळे, पटोले यांच्यासह पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी उपअधीक्षक भाग्यश्री नवटाके यांच्या ध्वनिफिती असल्याचेही पाटील यांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित बिटकॉइन घोटाळ्याच्या तपासाची व्याप्ती वाढविताना ईडीने बुधवारी मेहताच्या घराची झडती घेतली.
मेहताचे काही राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींबरोबर लागेबांधे असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. मेहताकडे आताही शेकडो कोटींचे मूल्य असलेले अनधिकृत बिटकॉइन असल्याची शंका पाटील यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.