संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीतील मित्र पक्षाकडून काँग्रेसपासून फारकत घेण्याची स्पर्धा सुरू असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत केजरीवालच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. याशिवाय काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत (आप) युती केली असती तर काँग्रेसलाही त्याचा लाभ झाला असता, असे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या विधानावरून त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आक्रमक झाले आहेत.
दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. इंडिया आघाडीतील सर्वच मित्र पक्ष काँग्रेसपासून फारकत घेताना दिसत आहेत. दिल्लीत आपनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपसमोर काँग्रेस, भाजपचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केले आहे. दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की, तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी खुलासा केला आहे. काँग्रेसकडूनही त्यांच्यावर टीका झाली. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. दरम्यान दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. येथे भाजप, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. गेल्या वेळी आपने दिल्लीत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यावेळी कोणाचा विजय होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपला मोठा धक्का
दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच भाजपला पहिला धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने भाजपच्या मंदिर सेलला सुरुंग लावला आहे. बुधवारी (८ जानेवारी) अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत भाजप मंदिर सेलच्या अनेक वरिष्ठ कार्यर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यात विजय शर्मा, जितेंद्र शर्मा, ब्रजेश शर्मा, मनीष गुप्ता, दुष्यंत शर्मा, उदयकांत झा यांचा समावेश आहे.