प्रातिनिधिक छायाचित्र....
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, "कदाचित अरविंद केजरीवाल निवडणूक जिंकतील". तथापि, त्यांनी असेही म्हटले की, "काँग्रेस देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे." दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
तर बरे झाले असते - चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "दिल्ली निवडणूक ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. मला वाटते की केजरीवाल तिथे कदाचित जिंकतील. काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहे, काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आणि आप यांच्यात युती असती तर बरे झाले असते पण असं काही होणार नाही असं दिसत आहे. दिल्लीत काय चाललंय ते इथे बसून सांगणं कठीण आहे."
पक्षाला घरचा आहेर...
दिल्ली काँग्रेस सतत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, टीका-टिप्पणी करत आहे. त्यामुळे दिल्लीत निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान करत स्वत:च्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आला आहे .
अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. येथून काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून संदीप दीक्षित विजयाचा दावा करत आहेत. त्याच वेळी, भाजपने या जागेवरून माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीत पराभूत ...
महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत म्हणजेच 2024 विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ते कराड दक्षिणेकडून मैदानात होते. ही जागा भाजप उमेदवाराने जिंकली होती.