प्रातिनिधिक छायाचित्र....
World Health Organization On HMPV Virus : देशात ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) चे रुग्ण आढळल्यापासून लोक चिंतेत आहेत. जेव्हापासून हा विषाणू उदयास आला आहे, तेव्हापासून लोक त्याला कोरोनाइतकेच धोकादायक मानत आहेत आणि त्याबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. कोविड-19 प्रमाणेच, हा विषाणू देखील चीनमधून संपूर्ण जगात पसरत आहे, त्यानंतर बरेच लोक असा अंदाज लावत आहेत की कदाचित हा विषाणू नवीन साथीचे कारण बनू शकेल.
तथापि, हे खरे नाही. सध्या, HMPV विषाणूबद्दल अशी कोणतीही माहिती नाही आणि तो कोरोनाइतका धोकादायक मानला जात नाही. आरोग्य तज्ञ याबाबत लोकांच्या मनात असलेले गोंधळ सतत दूर करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (WHO माजी मुख्य शास्त्रज्ञ) यांनीही ही माहिती शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे म्हटले आहे की, "ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही व्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल घाबरण्याची गरज नाही."
WHO च्या माजी शास्त्रज्ञ डॉ. सौम्या काय म्हणाल्या?
डॉ. सौम्या यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल नेटवर्किंग साइटवर एक पोस्ट शेअर केली आणि लोकांना या विषाणूबद्दल माहिती दिली आहे आणि त्यांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "हा एक जुना विषाणू आहे जो श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो आणि बहुतेक प्रकरणे सौम्य असतात," असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
यासोबतच, त्यांनी लोकांना सर्दीच्या लक्षणांसाठी सामान्य खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला. त्यांनी लिहिले आहे की, "प्रत्येक रोगजनकांचा मागोवा घेण्याऐवजी, सर्दी झाल्यावर आपण सर्वांनी साधी खबरदारी घेतली पाहिजे. मास्क घाला, हात धुवा, गर्दी टाळा आणि गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या."
ते दावे WHO नं फेटाळले....
चीनने आणीबाणी जाहीर केल्याचे सोशल मीडियावरील दावे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फेटाळून लावले आहेत. एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसच्या प्रादुर्भावासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) महत्वाची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेले वेगवेगळे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच चीनमधील आरोग्य सेवा प्रणालीवर या व्हायरसचा कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कोणतीही आपत्कालीन घोषणा केली गेलेली नाही, असं डब्ल्यूएचओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
डब्ल्यूएचओ टीम लक्ष ठेवून....
WHO ने म्हटले आहे की, HMPV हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे जो हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये अनेक देशात आढळून येतो, मात्र, सर्व देश यासंदर्भात नियमितपणे एचएमपीव्हीचा डेटा तपासत नाहीत आणि प्रकाशितही करत नाहीत. डब्ल्यूएचओने पुढे अहवालात असंही म्हटलं आहे की, "डब्ल्यूएचओ चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच एचएमपीव्ही या विषाणूबाबत कोणतीही आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच डब्ल्यूएचओ टीम जागतिक, प्रादेशिक आणि देश पातळीवर श्वासोच्छवासाच्या संसर्गाबाबत लक्ष ठेवून आहे."
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, श्वासोच्छवासाच्या संसर्गामध्ये वाढ विशेषत: चीनच्या उत्तरेकडील प्रांतांमध्ये दिसून आली आहे. श्वासोच्छवासाच्या संसर्गात झालेली वाढ मर्यादेत असून चीनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केली असून चीनमध्ये हॉस्पिटलचा वापर गेल्या वर्षीपेक्षा कमी झाला आहे.
तरीही सावधगिरी बाळगली पाहिजे....
हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळे श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. गंभीर आजार असलेल्या लोकांनी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घेतली पाहिजे, असं WHO नं म्हटलं आहे. तसेच एचएमपीव्ही हा विषाणू कोरोना एवढा घातक नसल्याचं काही आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगत आहेत.