Tirupati Stampede: तिरुपती देवस्थानात चेंगराचेंगरी; वैकुंठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान झाला गोंधळ

तिरुपती : आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये दर्शनाचे तिकीट मिळवताना झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

तिरुपती देवस्थानात चेंगराचेंगरी

तिरुपती : आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये दर्शनाचे तिकीट मिळवताना झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. देशभरात उत्तम व्यवस्थापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या धार्मिक ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वैकुंठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान हा प्रकार घडला. मंदिरातील विष्णू निवासम परिसरात ही दुर्घटना घडली.

तिरुपती तिरुमला देवस्थानमध्ये (टीटीडी) दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचे आयोजन केले जाते. बुधवारी (दि. ८) या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचे टोकन वितरित करण्यात येणार होते. यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र काऊंटर्सची व्यवस्था करण्यात आली. सकाळपासूनच या काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचेही दिसून आले.  यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू आणि ३० जण जखमी झाले आहेत.

३० जण जखमी
मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत जखमींपैकी बहुतेक लोक तामिळनाडूचे आहेत. या चेंगराचेंगरीत किमान ३० जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 'तिरुपती, आंध्र प्रदेश येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुख:त सहभागी असून या घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. आंध्र प्रदेश सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे, असेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

टीटीडी अधिकाऱ्यांबाबत संताप
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेतील भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नायडू यांनी जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. दरम्यान आपल्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल देशभरात प्रसिद्ध असलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थानममध्ये चेंगराचेंगरीसारखा गैरप्रकार घडल्यामुळे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीबाबत मुख्यमंत्री नायडू यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जर मंदिरात गर्दी वाढत होती तर तिथे योग्य सुरक्षा व्यवस्था का केली गेली नाही? वैकुंठ एकादशीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार याची कल्पना अधिकाऱ्यांना नव्हती का, भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिरात त्यानुसार तयारी का केली गेली नाही? अशा ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या लोकांना अधिक सतर्क आणि जबाबदार असण्याची गरज नाही का?, असे सवाल नायडू यांनी उपस्थित केले आहेत.  मृतांचा आकडा आणखी वाढू नये म्हणून जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश मुख्यमंत्री नायडू यांनी दिले आहेत. जखमींना उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांबद्दलही त्यांनी माहिती मागितली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री नायडू यांनी टीटीडीच्या टोकन काउंटरच्या ऑपरेशन आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

व्हायरल व्हीडीओमुळे समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी
व्यंकटेश हे मूळचे विशाखापट्टणमचे असून वैकुंठ एकादशीनिमित्त ते तिरुपतीला पत्नी आणि मुलाबरोबर गेले होते, पण त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. दर्शनाकरता टोकन घेण्याकरता हे कुटुंब विष्णू निवासजवळ रांगेत उभे होते. या रांगेत आधीच खूप गर्दी होती. परंतु, एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला बाहेर काढण्याकरता एका अधिकाऱ्याने तेथील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तेथील भाविकांना वाटले की, टोकन देण्यासाठी दरवाजा उघडला आहे. त्यामुळे भाविकांनी आतमध्ये गर्दी केली. यातच चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. यातच व्यंकटेश यांची पत्नी शांता यांचाही समावेश होता. याबाबत व्यंकटेश म्हणाले की, पोलिसांचे व्यवस्थापन फार वाईट होते. माझी पत्नी रांगेत पुढे उभी होती. ती पडल्याचे आम्हाला कोणालाही कळले नाही. चेंगराचेंगरीनंतर आम्ही तिचा हताशपणे खूप शोध घेतला. रुग्णालयात जाऊनही तिची चौकशी केली. पण आम्हाला तिच्याबद्दल काहीच कळले नाही. परंतु, एका व्हायरल व्हीडीओमुळे तिचा मृत्यू झाल्याचे समजले. दरम्यान व्यंकटेश, त्यांची पत्नी शांती व त्यांचा मुलगा तिरुपती येथील वैकुंठ दर्शनासाठी तिरुपती येथे आले होते. ते मूळचे विशाखापट्टणम येथील आहेत. देवाचे दर्शन होईल या आशेमुळे ते आनंदी होते. मात्र, पुढे घडणाऱ्या गोष्टींबाबत ते अनभिज्ञ होते. जिल्हाधिकारी डॉ. एस व्यंकटेश्वर यांनी सांगितले की, काउंटरवर पुरेशा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ही घटना दुर्दैवी होती. तिथे पुरेसा फोर्स आणि व्यवस्था होती. जेवण, पाणी, स्वच्छतागृहे, सगळी काळजी घेतली होती. मंदिराचा कारभार पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानने दुर्घटनेमागे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारली आहे.

Share this story

Latest